कांदळवनांना कचऱ्याचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:47 AM2018-06-17T01:47:05+5:302018-06-17T01:47:05+5:30
मत्स्य प्रजननाची प्रमुख प्रक्रिया खंडित होण्याची शक्यता असून, त्यामुळे माशांचे प्रमाण घटत असल्याची माहिती खाडी क्षेत्रातील मत्स्य अभ्यासक शेतकरी प्रा. सुनील नाईक यांनी दिली आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : कांदळवनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, थर्माकॉलयुक्त घनकचरा टाकला जात आहे, त्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या होणा-या मत्स्य प्रजननाची प्रमुख प्रक्रिया खंडित होण्याची शक्यता असून, त्यामुळे माशांचे प्रमाण घटत असल्याची माहिती खाडी क्षेत्रातील मत्स्य अभ्यासक शेतकरी प्रा. सुनील नाईक यांनी दिली आहे.
मत्स्य प्रजननाचा कालावधी मान्सून प्रारंभानंतर सुमारे दोन महिन्यांचा असतो. या कालावधीत समुद्रातील मासेमारी सुरू राहिल्यास मत्स्य प्रजोत्पादनावर विपरित परिणाम होऊन मत्स्य दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. यास आळा घालण्याकरिता दरवर्षी १ जून ते ३१ जुलै, अशा दोन महिन्यांच्या कालावधीत शासनाकडून समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यात येते; परंतु प्रत्यक्ष समुद्रात मत्स्य प्रजनन होत नाही तर ते समुद्र खाडीकिनारी असलेल्या कांदळवनांमध्ये होते. या ठिकाणी मासे अंडी घालतात आणि प्रत्यक्षांत प्रजोत्पादनाची प्रक्रिया होते; परंतु घनकचºयामुळे ही प्रजननस्थळेच नामशेष होत आहेत, हे पर्यावरणाºया दृष्टीने अत्यंत घातक असून, याबाबत शासनाचा वन विभाग, मत्स विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ, यांनी गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करणे अत्यावश्यक झाले असल्याचे प्रा. नाईक यांनी सांगितले.
समुदातील मोठे मासे मे ते जून या कालावधीत प्रजनन प्रक्रियेचा भाग म्हणून छोट्या खाड्यांमध्ये येतात. छोट्या खाड्यांच्या किनारी असलेली कांदळवन वनस्पतींची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. कांदळवनांची मुळे चिखलातून वर आलेली असतात आणि या मुळांवर वलये असतात, याच संरक्षित क्षेत्रात मासे अंडी घालतात. कांदळवनाच्या सभोवताली त्यांच्या चिखलातून वर आलेल्या मुळांची एक नैसर्गिक संरक्षक भिंत उभी होते. त्यामुळे भरतीच्या वेळी लाटाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे काम मुळे यशस्वीपणे करतात. परिणामी, माशांची अंडी वाहून जात नाहीत. त्यानंतरच्या टप्प्यात अंड्यातून जन्माला आलेले छोटे मासेदेखील याच क्षेत्रात संरक्षित राहतात.
कांदळवनांच्या चिखलातून वर आलेल्या मुळांच्या नैसर्गिक भिंतीतून मोठे मासे येथे येऊ शकत नाहीत. परिणामी, छोटे मासे त्यांच्याकडून खाल्ले जात नाहीत आणि नवजात माशांची पूर्ण वाढ येथे होते आणि मग ते मासे खाडीत आणि पुढे समुद्रात जातात, अशी कांदळवनांतील नैसर्गिक मत्स्य प्रजोत्पादनाची प्रक्रिया नाईक यांनी स्पष्ट केली.
काही मासे खाड्यांमधून भातशेतामध्ये अंडी घालतात. पुढे हेच मासे मोठे होऊन कापणीच्या वेळेला शेतकºयांना मिळतात. विशेष करून खौल, वरस, चिवणा, पाला, जिताडा, कोळंबी, खेकडा या जातीचे जलचर खाड्यांमधील प्रदूषणामुळे आता रायगडमध्ये मिळतच नाहीत. या माशांचे नैसर्गिक प्रजनन पूर्णपणाने खंडित झाले आहे.
>वन विभागाने सक्रिय होणे आवश्यक
ग्रामपंचायतींकडे सरकारी जागा उपलब्ध आहेत. जेथे कांदळवने नाहीत, अशा ठिकाणची जागा ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव करून जिल्हाधिकाºयांकडे मागणी केल्यास खाडीकिनारच्या ग्रामपंचायतींचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटेल आणि माशांची नैसर्गिक प्रजनन प्रक्रिया संरक्षित राहील. पर्यावरणदृष्ट्या अतिसंरक्षित वनस्पतीमध्ये समावेश असलेली कांदळवने(मॅन्ग्रुव्हज) या वनस्पतीच्या संरक्षण आणि संवर्धनाची कायदेशीर जबाबदारी वन विभागाची आहे. मात्र, त्यांच्याकडून या बाबत काहीही केले जात नाही. अन्न साखळीमध्ये माशांना महत्त्व आहे. ही अन्न साखळी टिकण्यासाठी कांदळवनांमध्ये प्लॅस्टिक जाणार नाही, याची काळजी वनखात्याने स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन वेळीच घेतली पाहिजे, असा पर्याय खारेपाटातील कृतिशील शेतकरी ए. जी. पाटील यांनी सुचविला आहे.
>कांदळवनांतील कचरा घातक
जिल्ह्यातील खाडीकिनारच्या अनेक ग्रामपंचायतींकडे स्वत:चे डम्पिंग ग्राउंड नसल्याने प्लॅस्टिक, थर्माकॉल आदी घातक घनकचरा खाडीच्या किनारी व रस्त्याच्या कडेला आणून टाकला जातो. हेच प्लॅस्टिक वाºयाने उडून आणि ओहोटीच्या वेळी कांदळवनाच्या मुळाशी जाऊन घट्ट बसते. अशा कचºयाचे थरावर थर साचलेले अनेक ठिकाणी दिसून येतात. कांदळवनांची चिखलातून वर आलेली मुळे पाण्यातील आॅक्सिजन घेऊन झाडांना पुरवतात; परंतु ही प्रक्रि याच गेली काही वर्षे खंडित होत चालली असल्याने मत्स्य प्रजननाकरिता अत्यावश्यक असलेल्या कांदळवनांच्याच अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.