अलिबागमध्ये उभारणार कान्होजी आंग्रेंचे स्मारक; साडेसहा कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:04 PM2020-01-16T23:04:43+5:302020-01-16T23:05:08+5:30
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून काम
आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात, त्यामुळे येथील पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा राबता असतो. देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. अलिबाग ही सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची पुण्यभूमी आहे. मराठ्यांच्या सामर्थ्याचा जाज्वल्य इतिहास सर्वांसमोर यावा. त्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी कान्होजीराजे आंग्रे यांचे स्मारक अलिबाग-वेश्वी येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन येथील समुद्रकिनारेच सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनाला वाव आहे. मात्र, अद्यापही अशा पर्यटनस्थळांवर सोयी-सुविधांची वानवा आहे. जिल्ह्याला अनेक प्राचीन मंदिर, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन बंदर, बौद्धकालीन लेण्या असा वारसा लाभलेला आहे; परंतु आपण अद्यापही हे सर्व पर्यटनाच्या माध्यमातून एन कॅश करू शकलेलो नाही.
पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना उत्तम प्रकारच्या सोयी-सुविधा, पायाभूत सुविधा दिल्यातर पर्यटन व्यवसायाला बहर येण्याचा मार्ग खुला होणार आहे. केरळ आणि गोवा राज्यांनी पर्यटनाद्वारे मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटकांना आपापल्या राज्यामध्ये आकर्षित केले आहे. त्यामुळे परकीय चलनात वाढ झाल्याने ती राज्य पर्यटन उद्योगांच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आरमाराचे प्रमुख असणारे सरखेल कान्होजीराजे आंग्रे हे अलिबागचे होते. त्यांनी समुद्रमार्गाने शत्रूवर नजर रोखून धरल्यानेच शत्रूला सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास फार मोठा आहे. मराठ्यांच्या शौर्याची पराक्रमाची महती आजच्या पिढीला व्हावी आणि त्या माध्यमातून प्रेरणा मिळावी, यासाठी अलिबाग वेश्वी येथे कान्होजीराजे आंग्रे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून तब्बल सहा कोटी ५० लाख रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. स्मारकासाठी सुमारे सहा एकर जागेची आवश्यकता लागणार आहे. वेश्वी येथे सरकारच्या मालकीची फार मोठी जमीन आहे. याच जमिनीच्या काही भागावर कृषी अधीक्षक कार्यालय आहे. उर्वरित असणाºया जागेवर कान्होजीराजे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.
सरकार, प्रशासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे. वास्तविक हे आधीच होणे गरजेचे होते. मात्र, आता प्रत्यक्षात स्मारकाची संकल्पना सत्यात उतरत असल्याने आनंद होत आहे. मराठ्यांच्या सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास त्यानिमित्ताने नवीन पिढीलाही माहिती होण्यास मदत मिळणार आहे. सरकार आणि प्रशासनाला याबाबतीमध्ये जी काही मदत लागेल ती करण्यात येईल. - रघुजी आंग्रे, कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज
स्मारकामध्ये या वस्तू असणार
स्मारकामध्ये प्रामुख्याने कान्होजीराजे यांच्या दुर्मीळ वस्तू, चित्र प्रदर्शन, माहिती राहणार आहे. सर्व प्राथमिक स्तरावर आहे. आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे आणि नौदल यांच्याकडून साहित्य उपलब्ध होईल, त्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.