मधुकर ठाकूर
उरण : करंजा- रेवस या सागरी मार्गावरील तिकीट दरात मंगळवारपासून (१२) १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्रवास महागल्याने दररोज प्रवास करणाऱ्या कामगार आणि सामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी या मार्गावर २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता. दरवाढीमुळे या प्रवासाकरीता आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत.
उरण-करंजा ते रेवस या सागरी मार्गाने मागील अनेक वर्षांपासून प्रवासी वाहतूक सुरु आहे. ही जलसेवा बारमाही सुरू असते. या मार्गाने १५ ते २० मिनिटात पोहचता येते. तर अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. त्याचप्रमाणे येथे अनेक पर्यटनस्थळ पाहण्यासाठी ही याच मार्गाने ये जा करण्यासाठी मुंबई व नवी मुंबईतील प्रवासी ही प्राधान्य देत आहेत. वाहतुकदारांच्या मागणीवरून या मार्गावरील तिकीट दर वाढ करण्यात आली असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली आहे.