- मधुकर ठाकूर
उरण : एकीकडे भाऊचा धक्का- मोरा सागरी प्रवासी तिकिट दरात सप्टेंबरपासून २५ रुपये कमी होणार असतानाच दुसरीकडे करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवासासाठी तिकिट दरात १० रुपये वाढीची मागणी ठेकेदाराकडून करण्यात आली आहे. दरवाढीला बंदर विभागाने मंजुरी दिल्यास १ सप्टेंबरपासून करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
करंजा करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी मार्गावरुन प्रवासासाठी पावसाळी हंगाम वगळता दररोज सुमारे १२०० ते १५०० प्रवासी प्रवास करतात.अवघ्या २० मिनिटांत रेवस आणि त्यानंतर तासाभरात अलिबाग गाठता येत असल्याने दररोज ये-जा करणाऱ्या विविध शासकीय विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे.त्याशिवाय कोकणाकडे जाण्याचा शार्टकट म्हणूनही हा सागरी मार्गावर ओळखला जातो.
रस्त्याने एसटी अथवा इतर वाहनांतून अलिबाग गाठणे खार्चिक आणि अधिक वेळ लागतो.यामुळे कोणताही हंगाम असो या करंजा -रेवस सागरी मार्गावरुन मुंबईतुन अलिबाग मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी नाही.तसेच अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने बहुतांश शासकीय विभागांची मुख्यालये ही अलिबागमध्येच आहेत.त्यामुळे विविध शासकीय विभागांच्या कामांसाठी नागरिकांना अलिबाग गाठावे लागते. यामुळे करंजा -रेवस सागरी प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे.यामुळे या सागरी मार्गावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. करंजा-रेवस या सागरी मार्गावर सध्या आर.एन. शिपिंग आणि आर.के.बोटींग या खासगी दोन कंपन्यांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी बंदर विभागाने दिली आहे.सध्या प्रवासी संख्या रोडावली आहे.सध्या तिकिट दर २० रुपये आहे.मात्र महागाई वाढत चालली असल्याने इंधनाच्या दरातही भरमसाठ वाढ होत चालली आहे.त्यामुळे वाहतुक खर्चातही वाढ झाली आहे.
यासाठी सप्टेंबरपासून तिकीट दरात १० रुपये वाढ करुन देण्याची मागणी बंदर विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती आर.के.बोटींगचे मालक राकेश कोळी यांनी दिली.मात्र तिकिट दरात वाढ करण्यासाठी बंदर विभागाने अद्यापतरी मंजुरी दिलेली नाही.मात्र मंजुरी मिळाली तर सप्टेंबरपासूनच करंजा -रेवस सागरी मार्गावरील प्रवासी तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता करंजा बंदर निरीक्षक देविदास जाधव यांनी दिली.