- सुनील बुरूमकर ल्ल कार्लेखिंड
अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड - कनकेश्वर फाटा रस्ता अजूनपर्यंत खड्ड्यांतच चाचपडत आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करण्याचे अनेकांकडून टाळले जात आहे.या वर्षीच्या पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमय झाले होते. त्यामुळे या संपूर्ण पावसाळा ते मागील महिन्यापर्यंत प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. महाराष्ट्रातील महामार्ग राज्यमार्ग सोडा, परंतु ग्रामीण भागातील रस्त्यांना तर कोणीच वाली नाही. डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील, असे सरकारने जाहीर केले होते. मात्र अलिबाग तालुक्यातील सर्वच रस्ते अजून खड्ड्यांतच आहेत. यापैकीच तालुक्यातील मुख्य मार्ग समजला जाणारा कार्लेखिंड - कनकेश्वर फाटा याकडे अजून दुर्लक्षच आहे. गेल्या दोन वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याच मार्गावर बोंबिलवीरा येथील पुलाचे कठडे तुटलेले आहेत, पुलाची डागडुजी करणे गरजेचे अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. हा मार्ग चोंढी, किहीम, सासवणे, मांडवा जेटी अशा महत्त्वाच्या ठिकाणांना जोडलेला असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल असते. तसेच बीच, धार्मिक स्थळ, कनकेश्वर मंदिर तसेच आउटपोस्ट, फाउंटेन हेड अशी हॉटेल्स असल्यामुळे पर्यटक याच मार्गाने प्रवास करतात. याच मार्गाला अनेक गावे जोडलेली असल्याने स्थानिक लोकांचा प्रवास, शाळकरी मुले याच मार्गावरुन प्रवास करतात. कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा हा मार्ग सात किलोमीटरचा आहे. या मार्गावरुन प्रवास करताना लोकांना अक्षरश: जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागत आहे. खड्डे आणि धूळ यामुळे लोक हैराण झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरुन आरसीएफ खत कारखान्यातील अवजड वाहनांची वाहतूक सतत चालू असल्याने रस्त्यालगत असलेल्या गावांतील घरातून धुळीचे लोट जात आहेत. महिन्यापूर्वी कनकेश्वर फाटा ते सोगावपर्यंतच्या तीन साडेतीन किलो मीटरच्या अंतरातील खड्डे भरण्यात आले आहेत. त्याच्यापुढे कार्लेखिंडपर्यंत खड्डे भरण्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे.रस्त्याचे काम होतोय पण काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे रस्ता लवकर खराब होत आहे. या मार्गावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात होऊन सुध्दा शासनाचे दुर्लक्ष आहे. रस्त्याबरोबरच अलिबाग-मुरुड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, मात्र बरेचशे रस्ते सुस्थितीत नसल्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर राज्याचे सचिव यांना प्रत्यक्ष भेटून चांगल्या प्रकारचे रस्त्याचे काम कसे होईल, त्यासाठी आॅल इंडिया पॅसेंजर्सच्या वतीने पाठपुरावा केला जाईल.- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, आॅल इंडिया पॅसेंजर्सकार्लेखिंड-कनकेश्वर फाटा या मार्गावरील खड्डे भरुन डांबरीकरण करावे याबाबत वेळोवेळी संबंधित खात्याला कळवून सुध्दा दुर्लक्ष केले जात आहे. या विभागामार्फ त सामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल.- प्रफुल्ल पाटील, सरपंच, परहुर ग्रामपंचायत
कार्लेखिंड-कनकेश्वर फाटा मार्गावरील तरतुदीप्रमाणे खड्डे भरण्यात आले आहेत. पुढील खड्डे भरण्याचे काम तीन चार दिवसात सुरु होईल. संपूर्ण डांबरीकरणाचे कामासाठी अडीच कोटी निधी प्रस्तावित आहे. आणि ते मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम खाते, मुंबई येथे मंजुरीकरिता पाठविण्यात आले आहे. मंजुरी आली की रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु होईल.- व्ही. जी. देशपांडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग