कर्जत विधानसभा मतदारसंघ : वाहतूककोंडी, आरोग्य, रस्ते, पाणीसमस्या सुटता सुटेना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:01 AM2019-10-02T03:01:13+5:302019-10-02T03:01:56+5:30

कर्जत विधानसभा क्षेत्रात कर्जत तालुका, खोपोली नगरपरिषद क्षेत्र आणि खालापूर तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे.

Karjat Assembly Constituency: Traffic, health, roads, water is problems | कर्जत विधानसभा मतदारसंघ : वाहतूककोंडी, आरोग्य, रस्ते, पाणीसमस्या सुटता सुटेना

कर्जत विधानसभा मतदारसंघ : वाहतूककोंडी, आरोग्य, रस्ते, पाणीसमस्या सुटता सुटेना

- विजय मांडे
कर्जत : कर्जत विधानसभा क्षेत्रात कर्जत तालुका, खोपोली नगरपरिषद क्षेत्र आणि खालापूर तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे. या मतदारसंघात कर्जत, खोपोली आणि माथेरान अशा तीन नगरपरिषदा तसेच खालापूर नगरपंचायत आहे आणि विशेष म्हणजे, माथेरानच्या पायथ्याशी असलेली नेरळ ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षांपासून आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, खोपोली औद्योगिक क्षेत्र असूनही वाढती बेरोजगारी, पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने शहरांमधील वाहतूककोंडी, कर्जत-पनवेल लोकल सेवा माथेरान मिनीट्रेन सेवा आणि सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पेण अर्बन बँकेत अडकलेले ठेवीदारांचे पैसे आदी प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा निश्चितच प्रभाव पडणार आहे.

कर्जत शहर हे मुंबई-पुणे रेल्वे मार्गाच्या अगदी मधोमध आहे. त्यामुळे या शहराला महत्त्व आहे. तसेच तालुक्यात जगप्रसिद्ध माथेरान हे पर्यटनस्थळ असल्याने त्याला अधिक महत्त्व आहे. खोपोलीसाठी स्वतंत्र लोकल सेवा असल्याने खोपोली औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्येसुद्धा कर्जतहून असंख्य कामगार जात असतात. या औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांना टाळे लागले आहे तर काही आजारी पडल्याने बेरोजगारी वाढली आहे. दरवर्षी कोटी रुपये खर्च होत असूनही तालुक्यातील काही मुख्य रस्त्यांची चाळण झाली आहे. तर ग्रामीण भागातील रस्ते कित्येक दिवस डांबरीकरणाची वाट पाहत आहेत. चौक-मुरबाड रस्त्याचे रुंदीकरण अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. पळसदारी मार्गे जाणा-या कल्याण-खोपोली रस्त्याचे तर गेल्या कित्येक वर्षांपासून बांधकाम सुरू आहे.

मध्येमध्ये वनखात्याच्या जमिनीच्या अडचणीमुळे काही ठिकाणी रुंदीकरण रखडले आहे. चारचौकात अतिक्रमणांमुळे नेहमीच वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. १२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली कर्जत शहराची पाणीपुरवठा योजना अपुरी पडू लागली आहे. जलशुद्धीकरण केंद्र असूनही पावसाळ्यात नेहमीच नळाद्वारे गढूळ पाणी येत असते. योग्य दाब नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. वारंवार वीज खंडित होत असल्याने पाण्याचे वेळापत्रक आठवड्यातून एकदा तरी कोलमडतेच. गेल्या पाच वर्षांत त्याबद्दल ठोस निर्णय घेण्यात आला नाही.
कोंढणे धरण कथित भ्रष्टाचाराच्या गाळात अडकल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न भविष्यात उद्भवणार आहे. माथेरान पर्यटन स्थळात अनेक समस्या आहेत. नेरळची परिस्थितीही वेगळी नाही. अनेक वर्षांपासून सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात साकार होत नाही.

ढाक गाव पर्यटनस्थळ व्हावे
 माथेरान जागतिक पर्यटनस्थळ असले तरी कर्जत शहरापासून अवघ्या सहा-सात किलोमीटर अंतरावर डोंगरावर ढाक गाव आहे. तेथेसुद्धा मोठे पठार आहे. पुणे जिल्ह्यातूनसुद्धा तेथे सहज येता येईल. ते मिनी माथेरान म्हणून विकसित केल्यास पर्यटनस्थळ म्हणून त्याचा उदय होईल. अनेक वर्षांपासून त्याचा विकास व्हावा यासाठी स्थनिक प्रयत्न करीत आहेत; परंतु राज्य शासन हिरवा कंदील देत नाही.

 कर्जतकरांची एक महत्त्वाची समस्या म्हणजे पेण अर्बन बँक बरोबर दहा वर्षांपूर्वी ती बंद झाली आणि कर्जतकरांच्या तोंडचे पाणी पळाले. त्या वेळी जमिनींना चांगला भाव मिळत होता. अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या आणि त्याचे मिळालेले पैसे जास्त दराच्या लोभामुळे पेण अर्बन बँकेत ठेवले. थोडे थोडके नव्हे तर कर्जतकारांच्या ९०-९२ कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत आहेत. त्याच वेळी बँक बंद झाली.
 या घटनेमुळे काही जण हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. काहींच्या मुला-मुलींची अगदी साखरपुडा झालेली लग्नही पैसे नसल्याने होऊ शकली नाहीत. अनेकांची उपासमार झाली. अनेक संसार उद्ध्वस्त झाले. पैसे मिळण्यासाठी अनेक आंदोलने झाली. प्रत्येक वेळी ‘तारीख पे तारीख’ मिळत गेली. काहीही झाले नाही. हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न तसाच राहिला आहे.

तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवा, दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा गंभीर होत असलेला प्रश्न आदी अनेक समस्या आहेत. पाच वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने विकासात्मक कामे झाली त्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत झाली नाहीत.
- दीपाली पिंगळे, सरपंच,
रजपे ग्रामपंचायत

पनवेल लोकलसेवा सुरू व्हावी
कर्जत-पनवेल लोकलसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण ती कधी होणार? हा प्रश्न आहे. नेरळ-माथेरान, अमन लॉज-माथेरान मिनीट्रेन सेवा सुरू होणे गरजेचे आहे. हे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असले तरी सर्वसामान्यांना ते समजत नाहीत, हे प्रश्न सुटावे हीच अपेक्षा उपजिल्हा रुग्णालय असून काही उपयोग नाही, अशी गत झाली आहे. तेथे नवीन उपकरणांची आवश्यकता आहे. तसेच तज्ज्ञांची व संयमी वैद्यकीय अधिकाºयांची आवश्यकता आहे. मतदारसंघातील शहरापासून ते अगदी वाडी वस्तीतील रस्ते होणे गरजेचे आहे.

Web Title: Karjat Assembly Constituency: Traffic, health, roads, water is problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.