कर्जत महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक
By admin | Published: December 22, 2016 06:18 AM2016-12-22T06:18:58+5:302016-12-22T06:18:58+5:30
विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योगाची जोड कशी देता येईल यासाठी आयआयटीमध्ये तंत्रमहोत्सवात आयडीएट नावाची स्पर्धा
कर्जत : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योगाची जोड कशी देता येईल यासाठी आयआयटीमध्ये तंत्रमहोत्सवात आयडीएट नावाची स्पर्धा घेण्यात आली. टेकफेस्ट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील संकेत इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियरिंग स्टडीज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पॅट्रीयट नावाचा घरबसल्या शेतीवर लक्ष ठेवता येणारा प्रकल्प बनविला होता. त्यास प्रथम क्र मांक मिळाला आहे.
आयओटीच्या तंत्रज्ञानाचा नावीन्यपूर्णरीत्या उपयोग करून प्रत्येकाला शेतकरी बनण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व भारताला खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश बनवून शेतकऱ्याला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील संकेत इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियरिंग स्टडीज महाविद्यालयातील धनश्री म्हसे, नम्रता थोरवे, प्रियांका गोसावी, अक्षयी धुळे या विद्यार्थ्यांनी सूरज टाकेकर, शिरीष पाटील, गायत्री सावंत आदी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पॅट्रीयट नावाचा घरबसल्या शेतीवर लक्ष ठेवता येणारा प्रकल्प विकसित केला होता. यामध्ये शहरातील एखादी व्यक्ती शेत विकत घेऊन त्याची राखण करण्यासाठी गावातील एखादा व्यक्ती ठेवू शकतो. मात्र शेतात नेमके काय सुरू आहे याबाबत तपशील शहरातील माणसाला दिवसाच्या कोणत्याही वेळेला घेता येणे शक्य होणार आहे. यासाठी या विद्यार्थ्यांनी आयओटीचा वापर केला आहे. शेतातील बुजगावण्याच्या दोन्ही हातांवर एक चीप बसविण्यात आली आहे. यामध्ये सेल्फी मॉड्युल वापरण्यात आला आहे. यात झाडांसमोर कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्यातून झाड त्यांचे छायाचित्र टिपून ते सोशल मीडियावर शेअर करणार आहे. यामुळे झाडाला कोणता आजार झाला आहे याचा तपशील मिळणार आहे. या आजारावर उत्तर देण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे एखाद्या शहरी माणसाला घरबसल्या शेती करता येणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये या प्रोजेक्टला प्रथम क्र मांक मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)