कर्जत शिक्षण विभागाच्या उपक्रमाचा राज्यात डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 12:42 AM2021-02-02T00:42:45+5:302021-02-02T00:43:16+5:30

Karjat Education Department News : नवनियुक्त गतशिक्षण अधिकाऱ्यांनी गुणवत्तावाढीसाठी तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने नवनवीन उपक्रम राबविल्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित नवोपक्रम स्पर्धेत कर्जत तालुका पहिल्या दहा क्रमांकात आला आहे.

Karjat Education Department's initiative in the state | कर्जत शिक्षण विभागाच्या उपक्रमाचा राज्यात डंका

कर्जत शिक्षण विभागाच्या उपक्रमाचा राज्यात डंका

googlenewsNext

नेरळ - कर्जत तालुक्याचा शिक्षण विभाग मागील काही वर्षांत गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात शेवटच्या क्रमांकावर होता. मात्र, नवनियुक्त गतशिक्षण अधिकाऱ्यांनी गुणवत्तावाढीसाठी तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने नवनवीन उपक्रम राबविल्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित नवोपक्रम स्पर्धेत कर्जत तालुका पहिल्या दहा क्रमांकात आला आहे.

मार्च महिन्यात कोरोना आल्यामुळे संपूर्ण देश लॉककडाऊन  झाला. सगळ्यात जास्त नुकसान शालेय शिक्षण विभागाचे झाले. विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने  सुरू झाले; परंतु ज्या ठिकाणी नेटवर्क नाही तेथे काय करावे हा बऱ्याच पालकांना पडलेला प्रश्न होता, या काळातच कर्जतच्या गटशिक्षणाधिकारीपदाची धुरा, कर्जतमध्ये अध्यापन करणाऱ्या व स्पर्धा परीक्षा देऊन उच्च पदावर कार्यरत असलेल्या संतोष दौंड यांच्या खांद्यावर आली.  मुळातच उपक्रमशील व तंत्रस्नेही असणाऱ्या संतोष दौंड यांनी या पदाला पुरेपूर न्याय मिळवून देण्याचा ठाम निश्चय करून त्या दिशेने वाटचाल  सुरू केली. रायगड जिल्ह्यात  डाएटच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांशी संपर्क असल्याने त्यांनी तंत्रस्नेही शिक्षक हेरून त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपविली व यातून कर्जत शिक्षण क्रांती या यू-ट्यूब चॅनलची निर्मिती झाली. केवळ रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाच नव्हे,
 तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या चॅनलच्या माध्यमातून एक  आशेचा किरण मिळाला व शिक्षण घराघरात पोहोचले. 

यापुढील क्रांतिकारी व नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजे जो समाजशास्त्र विषय विद्यार्थ्यांना अतिशय कठीण वाटतो, तो विषय सहज सोपा करण्यासाठी डाएटच्या प्राचार्या चंद्रकला ठोके, सर्व अधिव्याख्याता व तंत्रस्नेही शिक्षकांना सोबत घेऊन मैत्री भूगोलाशी व सरावातून यशाकडे हा उपक्रम सुरू केला. त्यामुळे २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही चाचणी सोडविली असून, त्याचा फायदा त्यांना दहावीचे पेपर सोडविण्यासाठी निश्चित होईल यात शंका नाही.
या संपूर्ण यशामध्ये उपक्रमशील शिक्षिका ज्योत्स्ना बाक्रे शाळा (खडकवाडी), सारिका पाटील (करवली वाडी), भाग्यश्री केदार शाळा नौपाडा, जयश्री मोहिते, बेलवली (पनवेल), अश्विनी थोरात (अंतराड वरेडी), सारिका रघुवंशी (आद्ई पनवेल), श्रद्धा आंबुर्ले  (चिंचवली, माणगाव), नम्रता पानसरे (अशमी शाळा-३ रोहा), विद्या म्हात्रे (करंजाडे, पनवेल), विभावरी  सिंगासने (तळोजे पाचनंद, पनवेल), कुसुम हिंगे (बोरिवली, कर्जत), प्रशांत दळवी (कर्जत) या शिक्षकांचा समावेश असून, एकूण १९४ शिक्षक, शिक्षिकांनी या उपक्रमात भाग घेऊन उत्कृष्ट व्हिडिओ बनवून सादरीकरण केले. 

तालुक्याची गगनभरारी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल भूगोल सहायक सोनल गावंडे, तंत्रज्ञान विभाग, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर, संजय वाघ, राजेंद्र लठ्ठे, गणेश कुताळ, राकेश आहिरे यांनी जबाबदारी पार पाडली, या यशामुळे गुणवतेच्या बाबतीत जिल्ह्यात  १५ व्या स्थानी असणाऱ्या कर्जत तालुक्यातील शिक्षक व गटशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याने उंच गगनभरारी घेतली. भविष्यात तालुका प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे संतोष दौंड यांनी सांगितले, यामुळे सर्व स्तरातून गटशिक्षणाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

कर्जत तालुक्यातील गुणवत्ता वाढून, इतर जिल्ह्यांना आदर्श ठरावे असे कार्य यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून झाले आहे, त्यामुळे सर्व टीमचे व जिल्ह्यातील सर्व सहभागी शिक्षकांचे हे यश आहे, भविष्यात कर्जतला पहिल्या पाच क्रमांकांत स्थान मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू.
-संतोष दौंड, गटशिक्षणाधिकारी, कर्जत
 

Web Title: Karjat Education Department's initiative in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.