कर्जतमध्ये शिक्षकांकडूनच सर्व शिक्षा अभियानाला हरताळ, शिक्षकांची सोयीनुसार शाळेत हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 02:26 AM2020-01-22T02:26:06+5:302020-01-22T02:27:07+5:30
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी नादुस्त इमारती, शिक्षकांची कमतरता तर दुर्गम भागात शिक्षक सोईनुसार हजेरी लावत असल्याने सर्व शिक्षा अभियानाला हरताळ फासला गेला आहे
- कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी नादुस्त इमारती, शिक्षकांची कमतरता तर दुर्गम भागात शिक्षक सोईनुसार हजेरी लावत असल्याने सर्व शिक्षा अभियानाला हरताळ फासला गेला आहे; परंतु याकडे ना शाळा व्यवस्थापन समितीचे, ना शिक्षणविभागाचे लक्ष. शाळेत उशिरा येणाऱ्या शिक्षकांची वाट पाहून कंटाळलेले विद्यार्थी यामुळे शाळा ओस पडत असून, विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे, त्यानुसार कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातदेखील शाळा आहेत. कर्जत तालुक्यातील अधिकांश भाग हा आदिवासीबहुल भाग आहे. त्यामुळे दुर्गम भागात असलेल्या शाळेत मुले आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण करतात. मुले म्हणजे कच्ची माती, या मातीला मडक्याला आकार देण्याचे काम त्यांचे गुरू करतात. मात्र, शाळेत शिक्षकच उशीरा येत असतील, तर ही परिस्थिती ओढवणारच आहे. कर्जत तालुक्यातील शाळेत शिक्षक वेळेवर जात नसल्याने तसेच ट्रेन मिळवण्यासाठी सायंकाळी लवकरच पळ काढत असल्याचे समोर आले आहे. अशा शिक्षकांवर लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षण विभागाचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सोमवारी कळंब ग्रामपंचायत हद्दीतील सुतारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन्ही शिक्षक काम असल्याचे कारण सांगून उशिरा आले. तोपर्यंत कंटाळलेले अर्धे विद्यार्थी घरी निघून गेले, तर इतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर खेळ मांडला. तर नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील भोपळेवाडी येथे दुपारी १२ वाजेपर्यंत शिक्षक गायब असल्याने विद्यार्थ्यांनीही वर्गातून पळ काढला होता. दुर्गम भागातील अशा अनेक शाळांमधील शिक्षक हे आपल्या सोईनुसार शाळेत येत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारामुळे उज्ज्वल भारत घडणार कसा? हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. तर जिल्हा परिषद ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजेत म्हणून घेत असलेली मेहनत वाया जात आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? काही शाळांमध्ये विद्यार्थी उशिरा आला तर शिक्षक त्यांना शिक्षा करतात. मग अशा सोईनुसार शाळेत येणाºया शिक्षकांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने त्यांच्या स्तरावर अशा उशिरा येणाºया शिक्षकांवर भरारी पथके नेमून कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. तसा अहवाल आमच्याकडे द्यावा, त्यानुसार कारवाईचा निर्णय घेऊ.
- नितीन मंडलिक, शिक्षणाधिकारी,
प्राथमिक राजिप
ग्रामीण भागात शिक्षक शाळेत वेळेवर जात नसल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. त्यानुसार पंचायत समितीमध्ये चर्चादेखील झाली आहे. त्यामुळे आम्ही भरारी पथके नेमून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आशा शिक्षकांवर कारवाई करणार आहोत.
- धनसिंग राजपूत, प्रभारी गटशिक्षणाधिकारी
आमच्या ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय प्राथमिक शिक्षणाची सोय नसते. आमचे आदिवासी पालक गरीब असल्याने त्यांच्या मुलांना मोठ्या शाळेत घालू शकत नाहीत, म्हणून आमची सगळी मुले रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. मात्र, शिक्षक उशिरा शाळेत येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही. शिक्षण विभागाने वेळेत त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
- जैतू पारधी,
माजी अध्यक्ष,
आदिवासी संघटना