कर्जत-कल्याण राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:20 PM2019-07-10T23:20:57+5:302019-07-10T23:21:02+5:30
६१ कोटींच्या रस्त्यावरील डांबर निखळले : स्थानिकांसह प्रवासी त्रस्त; काम निकृ ष्ट झाल्याचा आरोप
कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील कर्जत तालुका हद्दीमधील २१ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी ६१ कोटी कामाला मंजुरी दिली आहे. त्या कामातील मे २०१९ मध्ये डांबरीकरण पूर्ण केलेली आंबिवली केबिन ते ठाणे जिल्हा हद्दीतील रस्त्यावर डांबर पावसाच्या पाण्यासोबत निघू लागले आहे. त्याच वेळी ६१ कोटींच्या कामाची मुदत आॅक्टोबर २०१९ मध्ये संपत असताना रस्त्यावर ११ किलोमीटरच्या भागात कोणत्याही प्रकारचे काम ठेकेदार कंपनीने सुरू केले नाही. दरम्यान, पुन्हा एकदा वाहनचालकांना कर्जत-कल्याण रस्त्यावर खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे.
कर्जत-कल्याण हा रस्ता दुपदरी असून या रस्त्यावर कर्जत तालुका हद्दीत अत्यंत खराब झालेल्या रस्त्याचे काम करण्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. शासनाने त्याआधी रस्त्याचे काम करण्यासाठी ६१ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र, ठेकेदार कंपनी काम सुरू करीत नव्हती. शासनाने २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी कामाचा ठेका दिलेल्या ठेकेदार कंपनीने फेब्रुवारी २०१९ मध्ये नेरळ भागात डांबरीकरण करण्यास सुरुवात केली. या रस्त्यावरील आंबिवली केबिनपासून नेरळ आणि पुढे शेलू येथील ठाणे जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्यावर डांबरीकरण काम सुरू करून मे २०१९ मध्ये पूर्ण केले. त्या दहा किलोमीटर अंतरात तीन ठिकाणी वनविभागाच्याजमिनीमध्ये रस्त्याचे काम अपूर्ण ठेवून रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले गेले. मात्र, कर्जतपर्यंतच्या ११ किलोमीटरच्या रस्त्याचे काम त्यानंतर सुरू होणे अपेक्षित असताना आजपर्यंत सुरू झाले नाही.
कर्जत ते ठाणे जिल्हा हद्द या २१ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ६१ कोटी रुपयांची निविदा मंजूर करताना रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदत ठेकेदार कंपनीला देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत कर्जतपासून आंबिवली केबिन या ११ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवातही करण्यात आली नाही. त्यात या ११ किलोमीटरच्या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून त्या खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाची मागणी सातत्याने होत होती; परंतु ठेकेदाराच्या मनात काय आहे? याची माहिती सर्वसामान्य वाहनचालकांना माहिती होत नसल्याने वाहनचालक खड्ड्यांतून प्रवास करीत आहेत. या भागातील रायगड हॉस्पिटल, वडवली, सावरगाव या ठिकाणी तर रस्त्याच्या सर्व भागात खड्डे दिसून येत आहेत.
दुसरीकडे मागील दोन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या दहा किलोमीटर रस्त्यावर टाकलेले डांबर आता निखळू लागले आहे. दामत, नेरळ भागात रस्त्यावर निखळलेले डांबर बाजूला करण्यासाठी या रस्त्याचे काम करणाऱ्या पी पी खारपाटील कंपनीचे कामगार हे रस्त्यावर पावसामुळे निघालेले डांबर बाजूला काढण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्याचा दर्जा हाच का? असा प्रश्न सामान्य विचारू लागले आहेत. त्यामुळे काही दिवस बुळबुळीत रस्त्यावरून प्रवास किती फसवा होता, याचा अनुभव वाहनचालकांना येऊ लागला आहे.
कर्जत-कल्याण रस्त्यावरील उर्वरित ११ किलोमीटरच्या रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम मंजूर आहे. आंबिवली केबिनपासून कर्जत चार फाटा असा हा ११ किलोमीटरचा भाग दुपदरी काँक्रीटचा बनणार आहे. आम्ही कामे लवकर सुरू करावीत, असे पत्र कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
- सुरेश लाड, आमदार, कर्जत
कर्जत-कल्याण रस्त्यावर २१ किलोमीटर काम हे शासनाने हायब्रीड योजनेमधून मंजूर केले आहे. ज्या योजनेत हे काम मंजूर आहे त्यानुसार त्या कामाची देखभाल पुढील दहा वर्षे करण्याचे नियम असून डांबर निघाले याबद्दल ठेकेदार कंपनी निर्णय घेईल.
- अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
आम्ही आणखी किती वर्षे खड्डे असलेल्या रस्त्याने जायचे? रस्त्याचे काम मंजूर असतानाही करीत नसलेल्या ठेकेदार कंपनीविरुद्ध न्यायालयात जायला हवे. डिकसळ भागात पाच वर्षे असलेले खड्डे रस्त्याच्या कामासाठी ६१ कोटी मंजूर होऊनही रस्त्याची दुरवस्था कायम आहे.
- किशोर गायकवाड,
सामाजिक कार्यकर्ते, डिकसळ