कर्जत : कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील वाहतूकसमस्या वाढत होती, ती सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सुरू केलेली टोइंग व्हॅन तांत्रिक बाबीमुळे बंद पडली होती. अखेर आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा १ मेपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही, कशीही गाडी पार्क करणाऱ्यांनो सावध, आपल्यावर कारवाई होऊ शकते.
कर्जत शहरातील वाहतूकसमस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. रुंद केलेले रस्ते कुणासाठी बांधलेत हासुद्धा एक संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्याला फेरीवाले व हातगाडीवाल्यांचा विळखा बसला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. त्यातच सकाळच्या वेळी चाकरमान्यांना, विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना तसेच प्रवाशांना गाड्या पकडण्यासाठी कसरत करावी लागते. मात्र, रात्री बाजारपेठेतील रस्ता मोठा दिसतो आणि दिवस उजाडला की रस्ता भरगच्च असतो. मध्यंतरी टोइंग व्हॅन सुरू केली आणि वाहतुकीचा प्रश्न चांगल्या प्रकारे सुटू लागला. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे ही टोइंग व्हॅन बंद करण्यात आली. याबाबत उपविभागीय पोलीस कार्यालय व नगरपरिषद यांना विचारणा केली असता, दोन्ही कार्यालयांनी आपापली जबाबदारी झटकली होती. त्यामुळे कर्जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधांतरीच राहिला होता.
वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस अडचणीचा ठरत चालला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि नगरपरिषद कार्यालयाकडे टोइंग व्हॅन बंद का केली? ती लवकर सुरू करा, असा प्रश्न उपस्थित केला असता उपविभागीय पोलीस कार्यालयाकडून यापूर्वी कर्जत नगरपरिषदेने टोइंग व्हॅनची योजना आखली होती, त्याद्वारे मिळणारा महसूल नगरपरिषद वसूल करून घेत होती. फक्त त्यावर देखरेखीकरिता टोइंग नियमन व मोटार केसेस कारवाई पोलीस विभाग करीत होते. याबाबत नगरपरिषदेकडे पाठपुरावा करावा, असे सूचित करून नगरपरिषदेकडे बोट दाखविले होते.अधिकृत पार्किंग कारवाईची बाब पोलीस विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने टोइंग व्हॅनची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. नगरपरिषदेने पार्किंगबाबत जागा निश्चित केल्या आहेत, असे उत्तर देऊन हात झटकले होते.
अखेर पंकज ओसवाल यांनी ‘आपले सरकार’ या अॅपवर याविषयी तक्रार दाखल केली होती. आपले सरकारवर ओसवाल यांनी पाच तक्रार अर्ज दाखल केले आहेत. पंकज ओसवाल यांच्या अर्जावर जिल्हा वाहतूक शाखा अलिबाग यांचे पत्र आले, त्या पत्रात नगरपरिषदेकडून टोइंग व्हॅनची उपलब्धता होताच टोइंग व्हॅनवर पोलीस कर्मचारी पुरविण्याची नियोजित कारवाई कार्यालयाकडून होईल, असे कळविण्यात आले.
संयुक्त बैठकीत झाला सकारात्मक निर्णयदरम्यानच्या काळात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नव्याने आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची या विषयावर संयुक्त बैठक झाली. त्याबाबत टोइंग व्हॅन सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आणि १ मे कामगार दिन या दिवसापासून आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा टोइंग व्हॅन सुरू करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना याची माहिती व्हावी म्हणून दोन दिवस बाजारातून गाडी फिरवण्यात येणार आहे. मात्र, दोन दिवसांनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे ठेकेदार ओम साई कन्स्ट्रक्शनच्या वतीने सांगण्यात आले आहे.