कर्जत : तालुक्यातील वरई ग्रामपंचायतीमधील आरवंद गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले हाेते. मात्र, फार्म हाउसच्या मालकाने पुन्हा अतिक्रमण करत, सरकारी आदेश जुमानत नसल्याचे दाखवल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शुक्रवारी जागेची पाहणी केली.संबंधित फार्म हाउसचा सातबारा ज्या महिलेच्या नावे आहे. त्यांचे पती कर्जत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पदावर काम करीत होते आणि तेच ग्रामस्थांचा रस्ता अडवितात? अशी माहिती माजी सरपंच रमेश धुळे यांनी दिली आहे. आरवंद स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असलेला रस्ता पोसरी-साळोख रस्त्याच्या बाजूने जातो. त्या ठिकाणी जमीन खरेदी करणाऱ्या सुहासिनी रामलाल सरोते यांनी रस्ताबंद केला आहे. याबाबत स्थानिक वरई ग्रामपंचायतीने कर्जत तहसील कार्यालयाकडे तक्रार केली होती. २२ जुलै, २०१९ मध्ये स्थानिक चार गावांतील ग्रामस्थांनी मोठे आंदोलनही उभे केले हाेते. त्यानंतर, कर्जतचे तत्कालीन तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी याबाबतचा अहवाल मागीतला हाेता. त्यावेळी सराेते यांनी १० फूट रस्ता देत असल्याचे लेखी प्रशासनाला लिहून दिले हाेते. त्यानंतर, तहसीलदार यांनी वरई ग्रामपंचायतीला २२ जुलै, २०१९ राेजी लेखी आदेश देत रस्ता माेकळा करण्यास सांगितले. त्यानुसार, वरई ग्रामपंचायतीने २०१९ मध्ये रस्ता माेकळा केला हाेता. मात्र, डिसेंबर, २०२० मध्ये संबंधित जमीन मालकामे पुन्हा रस्ता अडविला. संतप्त ग्रामस्थ रमेश धुळे आणि २०० हून अधिक ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन कर्जत तहसीलदार यांना दिले. कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी नायब तहसीलदार बाचकर यांना घटनास्थळी पाठवून सद्यस्थितीचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, ११ डिसेंबर रोजी नायब तहसीलदार बाचकर यांनी आरवंद येथील विवादास्पद जागेची पाहणी केली.कर्जत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीच्या बाजूने पूर्वापार रस्ता होता. त्यांची जमीन मोजणी केली, त्यावेळी त्यांची हद्द आणि आता बांधकाम केलेली हद्द यात तफावत आहे. त्यामुळे सरकारी सेवेतील व्यक्ती आपल्या ओळखीचा वापर करून अतिक्रमण करत आहेत. सरकारने यांची चाैकशी करावी.- रमेश धुळे, अध्यक्ष, तंटा मुक्त समितीतहसीलदार विक्रम देशमुख यांच्या आदेशाने आपण वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी आलो आणि पाहणी करून संबंधित अहवाल तहसीलदार यांना सादर करणार आहोत.सोपान बाचकर, नायब तहसीलदार, कर्जत
कर्जतमध्ये तहसीलदारांच्या आदेशाला केराची टाेपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 1:08 AM