कर्जत-पळसदरी भरदिवसा मेगाब्लॉक
By admin | Published: March 24, 2017 01:14 AM2017-03-24T01:14:45+5:302017-03-24T01:14:45+5:30
कर्जत ते पळसदरी दरम्यान भरदिवसा म्हणजेच सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतल्यामुळे चाकरमानी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल
कर्जत : कर्जत ते पळसदरी दरम्यान भरदिवसा म्हणजेच सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतल्यामुळे चाकरमानी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या वेळेदरम्यान खोपोलीहून सुटणारी १०.२० व ११.३० या लोकल पळसदरीपर्यंतच चालविण्यात येत आहे, तसेच कर्जतहून १०.५५ व १२.०५ हून सुटणारी लोकल कर्जत ते पळसदरीदरम्यान रद्द करण्यात आली आहे. कर्जत ते पळसदरीदरम्यान सध्या काही दिवसांपासून देखभाली कामानिमित्त रेल्वे प्रशासन मेगाब्लॉक घेत आहे. गेल्या आठवड्यापासून मेगाब्लॉक चे सत्र सुरूच आहे.
आज व उद्या सुद्धा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, परंतु हा मेगाब्लॉक कामाच्या दिवशी व तो ही सकाळी १० ते दुपारी १ च्या दरम्यान घेत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून खास करून चाकरमानी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे यामुळे हाल होत आहेत. या मेगाब्लॉकमुळे बसने किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत आहे.
इतर ठिकाणी मेगाब्लॉक रविवारी घेण्यात येत असताना येथे मात्र रात्री घेतला जात असतो. कर्जत ते पळसदरी या मार्गावरील मेगाब्लॉक कामाच्या दिवशी तो ही सकाळी १० ते दुपारी १ च्या दरम्यान घेऊन रेल्वे प्रशासन कर्जतकरांवर अन्यायच करीत असल्याचा आरोप कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज मांगीलाल ओसवाल यांनी केला आहे. पंकज ओसवाल यांनी डीआरएमला ट्विट करून मेगाब्लॉक रद्द करण्याची विनंती सुद्धा केली आहे. (वार्ताहर)