कर्जत पंचायत समितीला हुतात्म्यांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:07 AM2018-08-09T03:07:52+5:302018-08-09T03:07:56+5:30

स्वातंत्र्य चळवळीत तालुक्यातील दोन क्रांतिकारकांना हौतात्म्य आले.

Karjat Panchayat Samiti forgot the martyrs | कर्जत पंचायत समितीला हुतात्म्यांचा विसर

कर्जत पंचायत समितीला हुतात्म्यांचा विसर

Next

- विजय मांडे 
कर्जत : स्वातंत्र्य चळवळीत तालुक्यातील दोन क्रांतिकारकांना हौतात्म्य आले. दोन्ही हुतात्म्यांचे अर्धपुतळे कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात विधिवत लावले होते. मात्र, पंचायत समितीच्या कार्यालयाचे स्थलांतर झाले आणि त्या जुन्या इमारतीमधील मिटिंग हॉल कुलूप लावून बंद करण्यात आला होता. २०१२ पासून हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या पुतळ्यांचे काय झाले, हे पाहायला कोणी फिरकले नाही.
दरम्यान, नवीन इमारत तयार होऊनदेखील कर्जत तालुक्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील दोन्ही हुतात्म्यांचे पुतळे नवीन प्रशासकीय इमारतीत उपसभापती यांच्या दालनात प्लॅस्टिक आवरणात अडकले आहेत.
तालुक्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जाग्या राहाव्यात, म्हणून तत्कालीन सभापती श्रीराम पाटील यांच्या कार्यकाळात १९७८ मध्ये कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात त्यांचे अर्धपुतळे बसविण्यात आले. हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील हे ज्या मानिवली गावचे होते, त्याच गावचे सभापती असल्याने त्यांनी पुढाकार घेऊन पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात चबुतरे बांधून पुतळे स्थापित केले. त्यानंतर कर्जत पंचायत समितीमध्ये होणाऱ्या सर्व बैठका, मासिक सभा यांची सुरुवात कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि सभागृहातील हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून होत असे. जिल्हा लोकल बोर्डाने उभारलेल्या कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कर्जत पंचायत समितीची इमारत जीर्ण झाल्याने इमारत कोसळून अपघात होऊ नये, म्हणून कार्यालयाचे स्थलांतरण २०१२ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले. मार्केट यार्ड येथील गोदामात पंचायत समितीचे कार्यालय हलविल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात ना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हलविला गेला आणि ना हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील यांचे पुतळे हलविले गेले. गुरुवारी क्रांतिदिनीतरी पुतळ्यांची पुनर्स्थापना होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
>दोन्ही हुतात्मे कर्जत तालुक्यातील असूनदेखील प्रत्येक शाळेत फोटो असावेत, यासाठी आंदोलन करावे लागले. दोन्ही हुतात्मे आमच्यासाठी देव, स्वाभिमान, अस्मिता आहेत. कर्जत पंचायत समितीने दिवाळीपूर्वी समारंभपूर्वक दोन्ही हुतात्मे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे नवीन प्रशासकीय इमारतीत स्थापित केले नाहीत तर प्रचंड मोठे आंदोलन उभे राहील.
- वसंत कोळंबे,
इतिहास संशोधक
>तालुक्याची अस्मिता असलेले दोन्ही हुतात्मे यांच्याविषयी पूर्ण आदर असून, तालुक्यातून आलेल्या प्रत्येकाला दर्शन व्हावे, यासाठी जागा उपलब्ध असून स्थापित करण्याची प्रक्रि या सुरू आहे.
- प्रदीप ठाकरे, सभापती
>नवीन प्रशासकीय इमारतीत पुतळ्यांना जागाच नाही
ज्यांची अस्मिता कर्जत तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या बोलण्यातून दाखवत असतो. त्या दोन्ही हुतात्म्यांचे पुतळे कुठे आहेत याची साधी आठवण कर्जत पंचायत समितीला इतकी वर्षे झाली नाही. त्याच वेळी कर्जतच्या पंचायत समितीच्या कार्यालयात साधा फोटोदेखील नाही. कर्जत तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत आणि सरकारी कार्यालयात तालुक्याचे भूमिपुत्र यांच्या प्रतिमेचे पूजन नियमित केले जाते. त्याच वेळी मागील पाच वर्षे या दोन्ही हुतात्म्यांचे पुतळे हे कुलूपबंद होते.
कारण कर्जत पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयातील सभागृह हे २०१२ नंतर इमारत धोकादायक झाल्याने कुलूप लावून बंद करण्यात आले होते. मागील सहा वर्षांत त्यांच्या बलिदानदिनी किंवा आॅगस्ट क्र ांतिदिनी, तसेच स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन यापैकी एकाही दिवशी कुलूप उघडून हार घालून अभिवादन केले गेले नव्हते. तत्कालीन सभापती अमर मिसाळ यांनी पुढाकार घेऊन आॅक्टोबर २०१७ मध्ये या दोन्ही हुतात्म्यांचे पुतळे नव्याने बनवून घेतले. मात्र, आॅक्टोबरअखेरपासून मुहूर्त मिळत नसल्याने या दोन्ही हुतात्म्यांचे पुतळे कर्जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय तीन मजली इमारतीत उपसभापती यांच्या दालनात प्लॅस्टिक वेष्टणात झाकून ठेवण्यात आले आहेत.

Web Title: Karjat Panchayat Samiti forgot the martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.