नाकाबंदीत कर्जत पोलिसांची कारवाई
By Admin | Published: May 21, 2017 03:43 AM2017-05-21T03:43:06+5:302017-05-21T03:43:06+5:30
शहरातून दुचाकी, चारचाकी गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण, गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने कर्जत चार फाटा येथे
- लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : शहरातून दुचाकी, चारचाकी गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण, गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने कर्जत चार फाटा येथे शनिवारी नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी विविध कारणास्तव ५१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आणि त्यांच्याकडून ११ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे.
कर्जत चार फाटा येथे सकाळी १० वाजता कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढवळे, सहायक फौजदार एस. एम. राऊत, पोलीस हवालदार वैभव पाटील, पोलीस नाईक अंकुश म्हात्रे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सहाने, तसेच वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी सहायक फौजदार सुभाष पाटील, पोलीस नाईक सुरेश पाटील, पोलीस नाईक मदन पाटील यांनी नाकाबंदी केली.
या वेळी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी स्वत: अनेक वाहने अडवून त्यांची तपासणी केली. या वेळी सीट बेल्ट न लावणे, गाडीला काळ्या काचा, ट्रिपल सीट, हेल्मेट न घालणे, वाहन चालवताना लायन्सस नसणे, अशा विविध कारणास्तव ५१ जणांवर कारवाई करून, ११ हजार ३०० रु पये दंड वसूल केला आहे. ही कारवाई सकाळी १० ते दुपारी १२:३० दरम्यान करण्यात आली.
चालकांकडून अनेकदा वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसते. याशिवाय शहरात वाहनचोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. यावर वचक राहावा, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. वाहन कायद्याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे.
- सुजाता तानवडे,
पोलीस निरीक्षक