लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील अविज व्हिलेज या फार्महाऊसमध्ये सोमवारी मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील पर्यटक पार्टी करण्यासाठी आले असताना कर्जत पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईमध्ये ३४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील अविज व्हिलेज फाॅर्म हाऊस रेस्टॉरंट येथे पार्टी सुरू होती. कोरोनाच्या अनुषंगाने पारित केलेल्या आदेशांचे उल्लंघन करून भरपूर लोक जमवून पार्टी चालली आहे, अशी माहिती कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांना मिळाली. कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या परवानगीने सहायक पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांनी कर्जत पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांना घेऊन मौजे वंजारवाडी येथील अविज व्हिलेज फार्महाऊस रेस्टॉरंटमध्ये जाऊन धाड टाकली असता तेथे लोकांची गर्दी आढळून आली. यात मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील एकूण ३४ तरुण-तरुणींचा समावेश असून, त्यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनावणे करीत आहेत.