- विजय मांडेकर्जत - पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, निर्धार सभा, अजित पवार यांचा रोड शो आणि पक्षाचे चिंतन शिबिर यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मावळ लोकसभेसाठी महायुतीत दबाव निर्माण करत असल्याचे गेल्या तीन दिवसांत दिसून आले. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांची तयारी हे पक्षाचे खरे लक्ष्य असल्याचेही यावेळी दिसून आले. या शिबिरानिमित्ताने राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून दिली. अजित पवार यांच्या रोड शो निमित्ताने जवळपास ४२ वर्षांनी कर्जत शहरात अशी मोठी मिरवणूक निघाली.
मावळमधून २०१९च्या निवडणुकीत अजित पवार यांचा मुलगा पार्थ यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. सध्या शिंदे गटात असलेल्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. पण कर्जत मतदारसंघातून पार्थ यांना १८५० मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय होईल, असे चित्र होते. परंतु शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांनी त्यावेळचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांचा १८,५०० मतांनी पराभव केला. त्या राजकारणाची बराच काळ चर्चा सुरू होती.
कुणाची सरशी?राष्ट्रवादीने जोर लावलेला असतानाच विद्यमान आमदार महेंद्र थोरवे शिंदे गटात आहेत. या मतदारसंघात तीन वेळा निवडून आलेले माजी आमदार सुरेश लाडही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर भाजपत प्रवेश करतील. तेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीची माळ महायुतीतील कुणाच्या गळ्यात पडणार, हा प्रश्नच आहे.
मंथन शिबिरात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी लोकसभेच्या चार जागांची घोषणा केली; पण मावळच्या जागेवर दावा सांगितला नाही. ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे ती हवी असल्यास राष्ट्रवादीला बरेच प्रयत्न करावे लागतील. कर्जत विधानसभेच्या जागेवरून महायुतीतील तिन्ही पक्षांत प्रचंड चढाओढीची शक्यता आहे. निर्धार सभेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतलेले सुधाकर घारे यांच्या नावे कार्यकर्त्यांनी वेळोवेळी घोषणा दिल्या. त्यावेळी पवार यांनी, तुमच्या घोषणा मला कळतात; पण हे सारे लोकसभा निवडणुकीनंतर होईल, असे सांगून विधानसभेचा विषय पुढे ढकलला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही घारे हे नवे नेतृत्व पुढे येत आहे. त्यांना रायगडचे नेतृत्व करायचे आहे, असे सांगून टाकले.