कर्जत : रेल्वे स्थानकातील लोणावळा बाजूकडे असलेल्या पुलाला मुंबई बाजूकडे जिना उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने या जिन्याचे काम मंद गतीने सुरू असल्याची कबुली रेल्वे प्रशासनाने कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांना माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला दिली आहे. हे काम डिसेंबर २०१७ ला पूर्ण करण्याचे टार्गेट रेल्वे प्रशासनाने आखले असल्याचेही कळविण्यात आले आहे.याबाबतीत पंकज ओसवाल गेली चार-पाच वर्षांपासून रेल्वे प्रशासनाचा पाठपुरावा करीत आहेत. या जिन्याचे काम पूर्ण होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील, असेही ओसवाल यांनी सांगितले आहे.काही महिन्यातच हे काम पूर्ण होऊन कर्जतकरांची गैरसोय दूर होणार होती. परंतु सुरू केलेले काम पुन्हा बंद केल्यामुळे कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे सदस्य पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता रेल्वेने निधी नसल्यामुळे या जिन्याचे काम डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे ओसवाल यांना कळविले आहे.एकंदरीत या जिन्याच्या कामाला सुरु वातीपासून ग्रहणच लागले आहे असेच म्हणावे लागेल. काही वर्षांपूर्वी तांत्रिक कारणासाठी कर्जत येथील लोणावळा बाजूकडे असलेला पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आला. नवीन पुलाच्या पायऱ्या विरुद्ध दिशेला म्हणजेच लोणावळाकडे होत्या. त्यामुळे प्रवाशांना वळसा घालून दोन व तीन क्र माकांच्या तसेच ईएमयू फलाटावरील गाड्या पकडण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यामुळे कर्जतकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली. याबाबतीत कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनास याबाबतीत जाब विचारला व पाठपुरावा सुरूच ठेवला व पुलाच्या पायऱ्यांची निविदा १२ सप्टेंबर २०१३ला काढल्याचे व त्या निविदांमध्ये लोणावळा रेल्वे स्थानकातील कामाचा समावेश होता व त्या दोन्ही कामांचा खर्च ५६ लाख रुपये होणार आहे. ठेकेदार निश्चित झाल्यानंतर वर्षभरात या जिन्याचे काम पूर्ण होईल असे रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना कळविले होते; परंतु जिन्याचे काम सुरूच होत नाही असे यांच्या निदर्शनास जेव्हा आले तेव्हा पुन्हा त्यांनी रेल्वे प्रशासनास जाब विचारला असता, ड्रॉर्इंगचे काम पूर्ण न झाल्यामुळे या जिन्याचे काम होण्यास विलंब होत असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले होते. या जिन्याचे काम १ नोव्हेंबर २०१५ ला सुरू होण्याची शक्यता आहे असे रेल्वेने कळविले होते. मात्र, फेब्रुवारी २०१६ सुरू झाले तरी कामाचा काहीच पत्ता नसल्याने ओसवाल यांनी पुन्हा विचारणा केली. त्या वेळी संबंधित ठेकेदारच काम करीत नसल्याने जिन्याचे काम रखडत असल्याचे रेल्वेने कळविले. (वार्ताहर)
कर्जत रेल्वे स्थानकातील जिन्याचे काम कासव गतीने
By admin | Published: March 23, 2017 1:38 AM