कर्जत रेल्वेस्थानकातील जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:27 AM2019-04-03T03:27:40+5:302019-04-03T03:28:02+5:30
दुरुस्तीची मागणी : फलाट क्रमांक तीनवर साचले पाणी
कर्जत : रेल्वेस्थानकावरील जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून, स्थानकावर पाणी साचल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे, यामुळे या जलवाहिनीची लवकर दुरु स्ती करावी, जेणेकरून प्रवाशांना होणारी गैरसोय दूर होईल, अशी मागणी कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
कर्जत रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक तीनवर ही जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे जलवाहिनीमधून पाणी फलाटावर येत आहे व ते साचून डबके तयार होत आहे, याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. फलाट क्रमांक तीनवर कर्जत-खोपोली, खोपोली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच काही एक्स्प्रेस गाड्या ये-जा करीत असतात, यामुळे फलाट क्रमांक तीनवर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते; परंतु गेल्या काही दिवसांपासून फलाट क्र मांक तीनवर जलवाहिनी फुटल्यामुळे फलाटावर पाणी साचत आहे व पाण्याचे डबकेसुद्धा तयार होत आहे. यामुळे प्रवाशंना त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये वरिष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना जास्तच त्रास सहन करावा लागत आहे. फलाटावरील फुटलेली जलवाहिनी त्वरित दुरुस्त करून प्रवाशांची गैसोय दूर करावी, अशी मागणी कर्जतचे पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.