कर्जतमधील रस्ते दुरुस्ती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:09 AM2017-07-27T01:09:39+5:302017-07-27T01:09:41+5:30
नगरपरिषद हद्दीतील बहुतेक रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. मात्र, काही रस्ते हे डांबरी आहेत, त्यामुळे ते खराब झाले आहेत. शहरातील मारु ती मंदिर ते मावकर हॉटेलपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे.
कर्जत : नगरपरिषद हद्दीतील बहुतेक रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. मात्र, काही रस्ते हे डांबरी आहेत, त्यामुळे ते खराब झाले आहेत. शहरातील मारु ती मंदिर ते मावकर हॉटेलपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरील खड्डे भरावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.याची दखल घेऊन नगरपरिषद प्रशासनाने नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम गुरुवारी सुरू केले आहे.
शहरातील बहुतेक रस्ते एमएमआरडीएच्या माध्यमातून झाले आहेत, तर काही रस्त्याची नगरपरिषदेने डागडुजी केली आहे. चौक-मुरबाड रस्त्यावरून कर्जत शहरात येणारा अभिनव ज्ञान मंदिरमार्गे भाऊसाहेब राऊत चौक ते मारु ती मंदिर आणि मारुती मंदिर चौक ते मावकर हॉटेलचा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावरून दोन गाड्या पास होत नाहीत. हा रस्ता अरुंद असूनही काही दुकानांसमोर चारचाकी गाड्या, सामान खाली करणारे टेम्पो, हातगाड्या नेहमीच उभ्या असतात. त्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हा रस्ता मुख्य बाजारपेठेत, रेल्वे स्थानकावर जात असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात हा रस्ता अरु ंद आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालकाला त्रास होतोच, मात्र त्याबरोबर पादचाºयाला गाड्या आणि रस्त्यावरील खड्डे चुकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावरील खड्डे भरावेत, अशी मागणी या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक करीत आहेत.
या रस्त्याच्या दुरवस्थेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले आणि रेल्वे प्रशासन जागे झाले. त्यांनी बुधवारी सकाळीच रेडी मिक्सच्या साहाय्याने नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले. विशेष म्हणजे मारु ती मंदिर ते मावकर हॉटेल या रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रथम प्राधान्य दिले. या वेळी नगरपरिषदेचे गटनेते राजेश लाड, विरोधी पक्षनेत्या यमुताई विचारे, नगरसेविका सुवर्णा जोशी, नगरसेवक मुकेश पाटील, संतोष पाटील, नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता राजेंद्र मयेकर आदी उपस्थित होते.