कर्जत एसटी आगाराचे उत्पन्न रायगड जिल्ह्यात सर्वाधिक
By admin | Published: August 21, 2015 02:22 AM2015-08-21T02:22:17+5:302015-08-21T02:22:17+5:30
चार - पाच वर्षांपूर्वी कर्जतचे एसटी आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी विविध क्लृप्त्या लढवून आगार वाचवून
विजय मांडे, कर्जत
चार - पाच वर्षांपूर्वी कर्जतचे एसटी आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी विविध क्लृप्त्या लढवून आगार वाचवून उत्पन्नही वाढविले होते. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपूर्वी पुन्हा आगाराचे उत्पन्न घटले व लाखो रुपयांचा तोटा होऊ लागला, परंतु एक चालक असलेल्या कामगाराकडे आगार व्यवस्थापकाचा पदभार देण्यात आला आणि आगाराचे आर्थिक उत्पन्न वाढले. मागील एप्रिल ते जून महिन्यात ३३ लाख ३४ हजार रु पयांचा तोटा असलेले आगार यंदा ती तूट भरून काढीत २६ लाख ४३ हजार
रु पये फायद्यात आला. विशेष म्हणजे सुमारे ५२ हजार किलोमीटर प्रवासात वाढ झाली असून प्रवासी संख्याही लक्षणीय वाढली आहे.
गतवर्षी जुलै महिन्यात ३५ लाख ८३ हजार रु पये तोटा होता. तो भरून काढून यंदा जुलैमध्ये ३ लाख १३ हजार रुपये फायदा झाल्याने रायगड जिल्ह्यात कर्जत आगार प्रथम क्रमांकावर आलेले आहे. तीस-बत्तीस वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार तुकाराम सुर्वे यांनी कर्जत आगार सुरु करण्यासाठी प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यावेळी एसटी ही एकच प्रवासाचे साधन होते. त्यामुळे एसटी फायद्यात होती. कालांतराने रिक्षा, सहा आसनी रिक्षा आल्या आणि एसटीची घरघर सुरू झाली. काही मार्गावरच्या एसटी गाड्या प्रवाशांअभावी बंद कराव्या लागल्या. त्यामुळे कर्जतचे आगार बंद होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तत्कालीन आगार व्यवस्थापक बी. एस. मगदूम यांनी अनेक क्लृप्त्या काढून विविध मार्गांवर गाड्या सुरू करून कर्जत आगाराला चांगले दिवस आणले. ते निवृत्त झाले व त्यानंतर कर्जत आगार अडचणीत आले. त्यानंतर तेथे आलेल्या तत्कालीन आगार व्यवस्थापकांची बदली झाली आणि प्रभारी आगार व्यवस्थापक पद आगारात चालक असलेल्या डी. एस. देशमुख यांच्याकडे आले.
विविध एसटी संघटनांमध्ये काम केलेल्या देशमुख यांना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी असल्याने सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन विविध उत्पन्नाच्या बाबी शोधून आगार सुस्थितीत आणले. लाखोंचा तोटा भरून काढून फायद्यामध्ये आगार आले आणि आज रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये उत्पन्नात प्रथम क्र मांकावर आणले. या कार्याबद्दल विभाग नियंत्रक अजित गायकवाड यांनी देशमुख यांचा सत्कार केला. (वार्ताहर)