कर्जत तालुका कुपोषणाच्या गर्तेत, अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या ७७वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:42 AM2017-12-30T02:42:47+5:302017-12-30T02:42:56+5:30
कर्जत : तालुक्याला गेली काही वर्षे कुपोषणाचा विळखा पडला आहे. कर्जत तालुक्यात सातत्याने कुपोषण वाढताना दिसत आहे.
विजय मांडे
कर्जत : तालुक्याला गेली काही वर्षे कुपोषणाचा विळखा पडला आहे. कर्जत तालुक्यात सातत्याने कुपोषण वाढताना दिसत आहे. शासनाकडून लाखो रुपये खर्च करून केलेल्या उपाययोजना फोल ठरताना दिसत आहेत. कारण डिसेंबर महिना संपत आला असताना नवीन वर्षाच्या प्रारंभी कर्जत तालुक्याला कुपोषणाने ग्रासले असल्याचे स्पष्ट होत आहे. आजघडीला तालुक्यातील अतितीव्र म्हणजे ‘सॅम’ श्रेणीमधील बालकांची संख्या तब्बल ७७वर जाऊन पोहोचली आहे. तर मध्यम म्हणजे ‘मॅम’ गटातील कुपोषित बालकांची संख्या १७४ वर जाऊन पोहोचली आहे. कुपोषणाची ही स्थिती सर्वाधिक भयावह असून, कर्जत तालुका कुपोषणाच्या गर्तेत सापडला जात असल्याचे जाणवत आहे.
कर्जत हा रायगड जिल्ह्यात आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पूर्णपणे आदिवासी असलेल्या भागाचा समावेश शासनाने आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आणला आहे. त्याचे कारण आदिवासी भागातील लोकांचे राहणीमान उंचावून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करताना त्यांचे आरोग्यही सुदृढ करण्याचा प्रयत्न शासनाने केला; परंतु आदिवासी भागातील मुलींची कमी वयात होणारी लग्ने, दोन अपत्यांवर न थांबता, ती दाम्पत्ये चार-पाच बालकांना जन्म देत असतात. अशा वेळी त्या मातेची शारीरिक क्षमता चार-पाच अपत्यांचे संगोपन करण्याची नसल्याने त्या मातेच्या पोटी जन्मणारे बाळ हे अनेकदा जन्मताच कुपोषित होत असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसरीकडे आदिवासी भागातील कुटुंबाला प्रथम कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजगार शोधावा लागतो आणि आपोआप संपूर्ण कुटुंबाचे विस्थापन कामधंद्यासाठी करण्याची वेळ आदिवासी व्यक्तीवर येते. या सर्व कारणांमुळे कुपोषणाचे प्रमाण वाढताना दिसून येते. याबाबतचे अहवाल दिशा केंद्र या स्वयंसेवी संघटनेने राज्याचे राज्यपाल यांना दोन वर्षांपूर्वी दिले होते. त्यामुळे कुपोषण कमी करण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा परिषदेने एकात्मिक बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून अनेक योजना राबवून नियोजन केले आहे; पण योजना राबवूनही कर्जत तालुक्यात मागील चार महिन्यांत कुपोषित बालकांची संख्या वाढतच आहे.
आॅगस्ट २०१७मध्ये कर्जत तालुक्यात अतितीव्र म्हणजे ‘सॅम’ श्रेणीमध्ये २२ बालके होती, त्यात वाढ होऊन सप्टेंबर महिन्यात २७ झाली. तर आॅक्टोबर महिन्यात ही संख्या ३२ वर पोहोचली आणि मोरेवाडी येथील घटना घडल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरु वातीला करण्यात आलेल्या कुपोषित बालकांच्या सर्वेक्षणात ही संख्या ५४वर जाऊन पोहोचली होती. त्या वेळी मध्यम कुपोषित बालकांची संख्या ही १०१पर्यंत जाऊन पोहोचली होती.
सर्व पातळीवर कर्जत तालुक्यातील कुपोषणावर चोहोबाजूंनी होत असलेली टीका लक्षात घेऊन आरोग्य एकात्मिक बालकल्याण विभाग यांनी एकत्र येत, सर्व ३३२ अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी या ठिकाणी नोंद असलेल्या बालकांचे वजन तपासून घेतले आणि त्यांची उंची तपासून घेतली. त्याचा परिणाम कर्जत तालुक्यात आजच्या घडीला अतितीव्र म्हणजे ‘सॅम’ श्रेणीमधील बालकांची संख्या ७७ झाली आहे. तर मध्यम कुपोषित म्हणजे ‘मॅम’ श्रेणीमधील बालकांची संख्या १७४वर गेली आहे. त्याचा अर्थ कर्जत तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या ही २५१ झाली आहे.
कर्जत तालुक्यात कळंब, नेरळ आणि खांडस या तीन प्राथमिक आरोग्यकेंद्रांच्या हद्दीत असलेल्या १६९ अंगणवाडीमध्ये ५० ‘सॅम’ श्रेणीची आणि ११५ ‘मॅम’ श्रेणीची बालके आढळून आली आहेत.
त्यातील खांडस या एका प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या परिसरात असलेल्या अंगणवाड्यांत तब्बल ९० कुपोषित बालके आढळून आली आहेत.
तर मोहाली, कडाव, आंबिवली या तीन प्राथमिक आरोग्यकेंद्रांच्या प्रकल्पात असलेल्या १६३ अंगणवाड्यांमध्ये ‘सॅम’ श्रेणीत २७ आणि ‘मॅम’ श्रेणीत ५९ बालके आहेत. अशी २५१ कुपोषित बालके कर्जत तालुक्यात असून त्यातील ७७ कुपोषित बालके मृत्यूच्या दाढेत आहेत.
>कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील आदिवासी कुटुंबाला दोन वेळचे अन्न मिळण्याची सोय नाही. त्यामुळे त्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी स्थलांतरण करावे लागत आहे. ही प्रक्रि या थांबविण्यासाठी शासनाने त्या कुटुंबांना याच ठिकाणी रोजगार मिळवून देण्याची गरज आहे. त्यांच्या नियोजनासाठी शासनाला रोजगार निर्मिती कार्यक्र म जाहीर करावा लागेल.
- अशोक जंगले, कार्यकारी संचालक दिशा केंद्र
आदिवासी लोकांच्या रोजगाराअभावी त्यांच्या कुटुंबातील बालके कुपोषित स्थितीत आढळत आहेत. आदिवासी समाजातील बालकांसाठी शासन राबवत असलेल्या योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत.
- जैतू पारधी, अध्यक्ष, आदिवासी संघटना