कर्जत ठाकूरवाडीला समस्यांचे ग्रहण, सुविधांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:36 AM2017-12-11T06:36:15+5:302017-12-11T06:36:26+5:30
कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील आदिवासींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील आदिवासींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन कारावा लागत आहे. असे असताना याकडे प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आदिवासी ग्रामस्थांकडून केला जात आहे.
यामध्ये प्रामुख्याने देऊळवाडी ते ठाकूरवाडी वस्तीमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे या कच्च्या रस्त्यावरून ग्रामस्थांना गेली कित्येक वर्षे ये -जा करावी लागत आहे. डोंगर उतारावर ही वाडी असल्याने संपूर्ण रस्ता वळणाचा आणि चढ-उताराचा आहे. येथे पक्का रस्ता नसल्याने शासकीय बससेवा तसेच खासगी रिक्षा सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या आदिवासींना जड सामान घेऊन दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते.
तसेच वाडीत कोणी जास्तच आजारी पडल्यास त्या रु ग्णाला चादरीची झोळी करून रु ग्णालयात न्यावे लागते, तर कधी कधी महिलांची प्रसूती नाइलाजाने जीव धोक्यात घालून घरीच करावी लागते. यामुळे महिलेला हवे तसे उपचार मिळत नाहीत.
या ठाकूरवाडीत सुमारे २० ते २५ आदिवासी घरांची वस्ती आहे. त्यांच्यासाठी येथे सार्वजनिक पाण्याची विहीर आहे. पावसाळा आणि त्यानंतर चार महिने जेमतेम पाणी पुरते. मात्र उन्हाळ्यात ही विहीर कोरडी पडत असल्याने दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र हे पाणीही कमी
पडत असल्याने येथील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन वणवण भटकावे लागते.
याबाबत ग्रामस्थांबरोबर संवाद साधला असता त्यांनी या वाडीची नोंद शासकीय दरबारी नसल्याचे सांगितले. या संदर्भात त्यांनी अनेक वेळा सरकार दरबारी खेटे घातले, परंतु त्यांना संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, अशी माहिती गणेश पारधी, पांडू दरवडे, मंगल साबरी, गणेश सांबरी, लक्ष्मण पिरकट, वामन सांबरी, प्रदीप सांबरी, चंद्रकांत हिंदोळा, काळुराम लोटे, दामू सांबरी, रामा दरवडे यांनी दिली.
विजेच्या समस्येने ग्रामस्थ त्रस्त
या वाडीवर वीज पोहोचली आहे; परंतु अनेक वेळा कमी दाबाने वीज असल्याची ग्रामस्थांची तक्र ारी आहेत. या वाडीत शासकीय साधन सुविधा सवलतीची कमतरता असून अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. ते अजूनही यापासून वंचित आहे.
या ठाकूरवाडीत सुमारे २० ते २५ आदिवासी घरांची वस्ती आहे. येथे अनेक सुविधांची वानवा आहे.