कर्जतमध्ये रेल्वे पुलाच्या चढणीवरून ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:42 AM2021-03-13T00:42:52+5:302021-03-13T00:44:16+5:30
चौक-मुरबाड रस्त्यावरील घटना : सुदैवाने रहिवाशांचे वाचले प्राण; चालकही सुरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : चौक-मुरबाड रस्त्यावर चारफाट्यानंतर असलेल्या रेल्वे पुलाच्या कर्जत बाजूच्या चढणीवर एक लोखंडी सळया भरलेला ट्रक पलटी झाला आणि अडकला, अन्यथा खाली राहणाऱ्या घरातील रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. ट्रक पलटी झाल्यावर ट्रकची पुढची काच फुटल्याने चालक सुरक्षितपणे बाहेर आला. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली.
लोखंडी सळया भरलेला ट्रक मुरबाडहून खोपोलीकडे जात असताना रेल्वे पुलाच्या अलीकडे असलेल्या चढणीवर ट्रॅक आला असता एका स्काॅर्पिओ गाडीने त्या ट्रकला हूल दिली आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चढणीवरील लोखंडी पाईपचा कठडा तोडून खाली पलटी झाला. हा ट्रक पूर्णपणे खाली न जाता मध्येच अडकला. यावेळी मोठा आवाज झाला व त्यातील लोखंडी सळया ट्रकमधून खाली असलेल्या मुद्रे बुद्रुकमधील घरांजवळ पडल्या. ट्रक अडकल्याने घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या जीविताचा धोका टळला. अन्यथा झोपेमध्ये किती जणांचे प्राण गेले असते हे सांगता येत नाही. हा ट्रक पलटी झाल्यावर त्याची समोरची काच फुटली त्यामुळे चालक रामदास कांबळे त्यातून सुरक्षित बाहेर पडला.