‘कर्नावती’लाही प्रदूषणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:14 AM2018-06-15T05:14:22+5:302018-06-15T05:14:22+5:30
पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे.
- वैभव गायकर
पनवेल - पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे. मात्र ग्रामीण भागातील नद्या देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. कर्नाळा येथून उगम पावणाऱ्या कर्नावती नदीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असल्याने येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे तक्रार केली आहे.
कर्नाळ्याच्या डोंगर रांगांमधून कर्नावती नदीचा उगम झाला आहे. याठिकाणाहून ही नदी सांगुर्ली ग्रामपंचायत हद्दीतील चिरवत, तुरमाळे, सांगुर्ली या गावानजीक वाहते. या परिसरात गोदाम, कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यातून घातक रसायनमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे कर्नावती नदी दूषित झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. नदीपात्रात दूषित पाण्याचा साठा वाढल्याने या नदीचे पाणी गुरांना देखील पिण्यास धोकादायक झाले आहे.
विशेष म्हणजे या दूषित पाण्यामुळे त्याठिकाणच्या रहिवाशांना उग्र वासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक ग्रामस्थ नीलेश वांगीलकर यांनी यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्र ार केली आहे. या परिसरात असलेल्या राक्यान कंपनीतून नदीच्या पात्रात दूषित पाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणात लक्ष घालून संबंधितावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा विषय गंभीर बनत चालला आहे.कासाडी नदी दूषित झाल्यामुळे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. शहरी भागातील नद्यांची दयनीय अवस्था झाली असून ग्रामीण भागातील नद्या देखील प्रदूषित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये यासंदर्भात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
जेडब्लूसी कंपनीशी करार करून संबंधित जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. आमची सर्व माहिती जेडब्लूसीकडे उपलब्ध असल्याने यासंदर्भात जेडब्लूसी व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.
- रंजित कौर, व्यवस्थापक, राक्यान कंपनी
संबंधित प्रकाराची सविस्तर माहिती घेण्यासाठी त्या परिसराची पाहणी केली जाईल. पाहणी केल्यानंतर यासंदर्भात भाष्य करणे उचित होईल.
- संदीप पवार, व्यवस्थापक, जेडब्लूसी
ग्रामस्थांनी केलेल्या
तक्र ारीची शहानिशा केली जाईल. या प्रकारात दोषी आढळलेल्या कारखान्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.
- सचिन आडकर,
अधिकारी, महाराष्ट्र
प्रदूषण नियंत्रण मंडळ