कासाडीचा राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेत सहभाग करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 06:36 AM2018-04-07T06:36:08+5:302018-04-07T06:36:08+5:30
तळोजामधील कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. पात्रामध्ये डेब्रिजचा भराव टाकून नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. या नदीचा राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेमध्ये सहभाग करून त्यामधील गाळ काढावा व पात्र प्रदूषणमुक्त करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे केली आहे.
- वैभव गायकर
पनवेल - तळोजामधील कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. पात्रामध्ये डेब्रिजचा भराव टाकून नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. या नदीचा राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेमध्ये सहभाग करून त्यामधील गाळ काढावा व पात्र प्रदूषणमुक्त करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू झाल्यामुळे पनवेलचे नाव देशाच्या नकाशावर झळकू लागले आहे. या परिसरामध्ये गृहनिर्माण व इतर मोठे प्रकल्प सुरू होऊ लागले आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये या परिसरामध्ये ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करताना पर्यावरणाकडे मात्र गंभीर दुर्लक्ष होऊ लागले आहे. विमानतळासाठी उलवे नदीचे पात्र वळविण्यात येत आहे. पनवेलमधील गाढी नदीच्या पात्रामध्येही अतिक्रमण होऊ लागले असून कासाडी नदीलाही प्रदूषणासह डेब्रिजच्या भरावाचा विळखा पडू लागला आहे. तळोजा परिसराची जीवनवाहिनी असलेल्या कासाडीमध्ये रासायनिक पाणी सोडले जात आहे. नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी भराव टाकून पात्र अरुंद बनविण्यात येत आहे. ‘लोकमत’ने ४ एप्रिलच्या अंकामध्ये कासाडी नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर पर्यावरणप्रेमी,सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी पुढाकार घेण्यास सुरवात केली आहे.
नगरसेवक अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना पत्र देऊन कासाडीचा नदी जोड प्रकल्पात समावेश करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन बारणे यांनीही तत्काळ केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांना पत्र देऊन कासाडी नदीचा राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. नदीमध्ये कारखान्यांमधील दूषित पाणी सोडले जात आहे. यामुळे प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली आहे. मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रदूषणामुळे परिसरामधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे कासाडीचा राष्ट्रीय योजनेमध्ये समावेश करून येथील गाळ काढण्यात यावा, नदीपात्राचे सुशोभीकरण करावे व पात्र प्रदूषणमुक्त करण्यात यावे, अशी सूचना केली आहे.
खासदारांनी पाठपुरावा सुरू केल्यामुळे कासाडीचे प्रदूषण थांबविण्यासाठी केंद्र शासनाकडून ठोस उपाययोजना होतील अशी अपेक्षा केली जात आहे.
पर्यावरण मंत्र्यांना पत्र
नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पत्र दिल्यानंतर खासदार बारणे यांनी तत्काळ दखल घेतली आहे. ५ एप्रिलला केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांना पत्र दिले आहे. कासाडी ही पनवेल तालुक्यातील महत्त्वाची नदी आहे. कारखान्यांमधील दूषित पाणी पात्रामध्ये सोडले जात आहे. मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. नदी प्रदूषण व गाळमुक्त करण्यासाठी कासाडीचा तत्काळ राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेमध्ये सहभाग करावा असे सूचित केले आहे.
अरविंद म्हात्रेंचे खासदारांना निवेदन : पनवेल महापालिकेचे नगरसेवक अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी ४ एप्रिलला खासदार श्रीरंग बारणे यांना पत्र देऊन कासाडीचा केंद्रीय योजनेमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक २ मधून वाहणाºया कासाडीचे पात्र प्रदूषित झाले आहे. यामुळे येथील पाण्याचा उपयोग करता येत नाही. नदी प्रदूषणमुक्त करावी, नदीमधील गाळ काढावा व नदीपात्राचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.