कशेडी घाटात रस्ता ५ फूट खाोल खाली खचला; वाहन चालकांनो सावधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 02:31 PM2021-07-26T14:31:15+5:302021-07-26T14:31:42+5:30
महामार्ग प्रशासनाने उपाययोजना करून ठेकेदार यांच्या मार्फत डागडुजी सुरु केली आहे.
- प्रकाश कदम
पोलादपूर- मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात मुसळधार पावसामुळे भोगाव गावचे हद्दीत सुमारे ९० ते १२५ फूट लांब रस्ता ५ फूट खोल खाली खचला आहे. महामार्ग प्रशासनाने उपाययोजना करून ठेकेदार यांच्या मार्फत डागडुजी सुरु केली आहे. मात्र ही मलमपट्टी असल्याचा आराेप स्थानिकांनी केला आहे.
मुंबई गोवा महामार्ग हा तळकोकणात जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. मात्र सन २००५ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृ्टीमुळे या ठिकाणी नेहमीच रस्ता खचन्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पोलादपूर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे पावसामुळे भोगाव हद्दीत महामार्ग नेहमीप्रमाणे सुमारे ५ फूट खोल खचला आहे.त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांनो आणि वाहन चालकानो सावधान असे म्हणण्याची वेळ आली आहे.
या ठिकाणी शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करून तात्पुरती मलमपट्टी करून रहदारी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाचा लाखो रुपये खर्च दरवर्षी वाया जात आहे, मात्र सन २००५ नंतर १६ वर्षाचा कालावधी लोटतो तोपर्यंत महामार्गावर शासनाकडून कोणतीही ठोस उपययोजना करण्यात आली नाही त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करने धोकादायक बनले आहे मात्र संबंधित खाते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या भागातील प्रवाशी जनता वाहन चालक यांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी काय स्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. या ठिकाणी ठेकेदार याचे कडून तात्पुरती मलमपट्टी करून काम करून घेतले जात आहे. सबंधित ठेकेदार यांना गेली ३ वर्षापासून या ठिकाणी काम केल्याचे बिल आदा करण्यात आले नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे.