कशेडी बोगद्याचे काम लवकरच मार्गी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:41 PM2019-08-29T23:41:23+5:302019-08-29T23:41:27+5:30
रवींद्र वायकर यांचा दौरा : घाटातील कामाचा घेतला आढावा; अधिकाऱ्यांना केल्या सूचना
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामकाजाची पाहणी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ जुलैदरम्यान केली होती. आता महामार्गावरील कशेडी घाट येथील बोगद्याची पाहणी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नुकतीच केली असून, कामाबाबत अधिकारिवर्गाला सूचना केल्या आहेत. बोगद्याचे काम २०१९ पर्यंत मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी येथील बोगद्याच्या कामाची पाहणी दौºयाच्या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रीय महामार्गाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात खेड हद्दीत सुरू असलेल्या बोगद्याची पाहणी करून वायकर यांनी कामकाजची माहिती घेतली. बांधकामाची गती वाढवून डिसेंबर २०१९ पर्यंत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर किमान दोन मार्गिकेवरील वाहतूक सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचनाही कंत्राटदारांना व अधिकाऱ्यांना दिल्या. २०२० च्या गणेशोत्सवापूर्वी चाकरमान्यांचा प्रवास नव्या मार्गावर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कशेडी घाटातील प्रवास होणार जलद, सुरक्षित
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा कशेडी घाट हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. घाटातील धोकादायक वळणांमुळे अनेक जीवघेण्या अपघाताच्या घटना घडतात. या दुर्घटना टाळण्यासाठी आणि चाकरमान्यांचा प्रवास कमी वेळात, सुखकर व सुरक्षित करण्यासाठी १.८० आणि १.९० कि.मी.चे दोन स्वतंत्र बोगदे बनविण्याचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. कशेडी बोगद्याचे १५० पेक्षा जास्त मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, उर्वरित काम विहित मुदतीत पूर्ण करण्यात येणार आहे.