काशीद समुद्रकिनारी गर्दी, वाहतुकीवर परिणाम; पर्यटकांची मुरुडला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 01:20 AM2021-01-25T01:20:09+5:302021-01-25T01:20:31+5:30
मुरुड व काशीद या ठिकाणी सर्व लॉज व हॉटेल हाउसफुल झाले आहेत
मुरुड : मुरुड व काशीद समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली असून, जिथे पाहावे, तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा दिसत आहेत. शनिवार, रविवार त्याचप्रमाणे, सोमवारी रजा टाकून मंगळवारची प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक आले आहेत. समुद्रकिनारी वाहनांच्या दाटी झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता.
मुरुड व काशीद या ठिकाणी सर्व लॉज व हॉटेल हाउसफुल झाले आहेत. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी राजपुरी येथेही मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. पर्यटकांची संख्या जास्त झाल्याने जंजिरा किल्ल्यावरील तिकीट घेण्याची वेळही बदलण्यात आली आहे. तिकीट घेतल्याशिवाय जंजिरा किल्ल्यात प्रवेश मिळत नाही. पूर्वीची वेळ सकाळी ९.३० होती, आता सध्या ती सकाळी ८.३०
ची करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या सर्व पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहता येत आहे. राजपुरी नवीन जेट्टी येथे शेकडोच्या संख्येने वाहनांची गर्दी तर शिडाच्या बोटीत बसण्यासाठीही पर्यटकांना मोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. किल्ला पाहण्यासाठीही पर्यटक मोठी गर्दी करीत आहेत. दिवसागणिक पर्यटकांची गर्दी किल्ल्यावर वाढल्याने वाहन पार्किंगसाठीही जागा कमी पडत आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील स्टॉलधारक व अल्पोहार, हॉटेल यांचा व्यवसाय तेजीत होता. प्रचंड गर्दीमुळे व मुख्य बाजारातून जंजिरा किल्ल्यावर जाणाऱ्या वाहनांमुळे मोठीच मोठी गर्दी दिसून येत आहे. मुरुड पोलीस ठाण्यामार्फत विविध ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येऊन वाहतूक व्यवस्था उत्तमपणे हाताळण्यात येत होती. मुरुड शहराच्या खरेदी मोठी गर्दी दिसून येत होती. यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली होती.