कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा - कविता द्विवेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:48 PM2019-04-28T23:48:38+5:302019-04-28T23:49:09+5:30
निर्भयपणे, प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी केले आहे.
नारायण बडगुजर
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) मतदान होणार असून निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदान हे हक्क आणि राष्ट्रीय कार्य आहे. त्यामुळे निर्भयपणे, प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी केले आहे. त्यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने साधलेला संवाद.
प्रशासकीय तयारीविषयी सांगा?
मतदानाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून सहा विधानसभा मतदारसंघांतील क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यांत प्रशिक्षण दिले. मनुष्यबळ सज्ज आहे. मतदान यंत्रांचे वाटपही झाले. नियंत्रण कक्ष, मीडिया सेल, आचारसंहिता भंग होऊ नये, म्हणून व्हिजिलन्स सतर्क आहे.
इमर्जन्सीमध्ये परिस्थितीवर नियंत्रणासाठी उपाययोजना कोणत्या?
नियमित, अतिरिक्त भरारी पथक सज्ज आहे. पोलिस पथकांचाही समावेश आहे. पनवेल आणि चिंचवड येथे प्रत्येकी अतिरिक्त चार, तर पिंपरीत भरारी पथके आहे. संवेदनशील केंद्रांवर कडेकोड बंदोबस्त आहे. केंद्रावरील गर्दी आणि त्यातून गोंधळ झाल्यास त्यावेळी कोणती दक्षता घ्यावी, याचे प्रशिक्षण केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहे. गोंधळ घालणाºयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबत अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत. मतदान यंत्रात बिघाड होणे. बिघाड झालेली यंत्रे बदलण्याचे अधिकार सेक्टर अधिकाºयांना आहेत. शहरी भागात १० ते १५ मिनिटांत तर ग्रामीण भागात २० ते २५ मिनिटांत मशिन बदलण्यात येईल.
स्थलांतरित मतदान केंद्रांबाबत उपाययोजना कोणत्या?
शाळेची इमारत धोकादायक असेल, पडझड झाली असेल. अन्य कारणांमुळे ठिकाणाहून मतदान केंद्र स्थलांतरित करावे लागते. अशा केंद्राचे स्थलांतर केल्याची माहिती मतदारांपर्यंत माध्यमांमार्फत पोहचविली असून जुन्या केंद्रावर सूचना फलक लावले आहेत.
‘वोटर स्लीप’ मिळाल्या नसल्यास मतदारांनी काय करावे?
‘वोटर स्लीप’ वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. शहरी भागातील काही मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळून आले नाहीत किंवा संबंधित बीएलओ (बूथ लेवल ऑफिसर) आणि मतदार यांची भेट झाली नसल्यास अशा मतदारांना स्लिप मिळाल्या नाहीत. अशा मतदारांसाठी चार पर्याय आहेत. १९५० या क्रमांकावरून, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ आदी पर्यायांचा वापर करता येईल. यासह सुविधा केंद्रातूनही वोटर स्लीप मिळू शकते. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी व्हील चेअर आहे.