लोकमत न्यूज नेटवर्कपाली : महाशिवरात्रीनिमित्त गुरुवारी पालीतील सरसगडावरील श्री केदारेश्वराच्या दर्शनासाठी नागरिक सरसगडावर दाखल झाले होते. चक्रीवादळात येथील मंदिराचे खूप नुकसान झाले होते. मात्र स्थानिक तरुणांनी हे मंदिर पुन्हा उभारले आहे.
पालीतील उमेश मढवी, अमीर वरंडे व अनेक सहकारी तरुणांनी प्रचंड मेहनत घेऊन श्री केदारेश्वराचे मंदिर पूर्ववत सुंदर बनवले आहे. लोखंडी अवजड खांब, पत्रे, मशीन आदी साहित्य अंगाखांद्यावर घेऊन किल्ल्यावर पोहाेचविण्यात आले. आणि मग कठीण परिस्थितीत मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळेच आज अनेक भाविकांना मंदिरात जाण्याचा आनंद घेता आला असे पालीतील शिक्षक अनिल राणे यांनी सांगितले.
विलोभनीय सरसगड बालेकिल्ल्यावर जोगेश्वरी (केदारेश्वर) मंदिर व त्याभोवती तळे आहे. सरसगड पालीतून देऊळवाडा आणि तळई आदिवासी वाडीवरून जाण्यास मार्ग आहे. किल्ल्यावर पाेहाेचायला साधारण एक तास लागतो. अग्निजन्य खडकापासून बनवलेल्या या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ४९० मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजूकडील १११ पायऱ्या सलग एकाच दगडात घडविलेल्या असून उंच व प्रशस्त आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी दक्षिण व उत्तर दोन्ही बाजूकडून वाटा आहेत. चुना व घडीव दगडांचा उपयोग करुन किल्ल्याला बुरुज व तटबंदी करण्यात आली आहे. या दोन्ही बाजूला किल्ल्यावर येण्यासाठी प्रवेशद्वार कोरलेले आहेत. दक्षिणेकडील दरवाजा ‘दिंडी दरवाजा’ म्हणून ओळखला जातो. किल्ल्यावर पिण्याचे खूप टाकी आहेत.