निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावे
By admin | Published: January 25, 2017 04:58 AM2017-01-25T04:58:24+5:302017-01-25T04:58:24+5:30
जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि शिक्षक मतदार संघात होणारी निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात
अलिबाग : जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि शिक्षक मतदार संघात होणारी निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात होण्यासाठी तसेच या काळात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावे, असे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी मंगळवारी दिले आहेत.
जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पाश्वभूमीवर निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत तेली-उगले बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, जिल्ह्यात दोन निवडणुकांची आचार संहिता सुरु आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कुठेही आचार संहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आचार संहितेचा भंग झाल्यास तात्काळ गुन्हे नोंदवावेत. याबाबत येणाऱ्या तक्र ारीचे निराकरण करावे. संवेदनशील मतदार केंद्र शोधून त्याची यादी तयार करावी व त्यानुसार तेथे बंदोबस्ताचे नियोजन करावे. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत. भरारी पथकाची नेमणूक करावी. परवाना असलेली शस्त्रे जमा करण्यासाठी असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. निवडणुकी संदर्भात लागणारे विविध परवाने देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा निश्चित करण्यात आली आहे, त्यानुसार कार्यवाही करावी. अवैध मद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी पोलीस विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाय-योजनाबाबत माहिती दिली. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, प्रांताधिकारी आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)