महाड : एकविसाव्या शतकात वाटचाल करीत असताना पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण कितीही होत असले तरी, आजची नवी पिढी देखील महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेची जपवणूक करीत आहे. याचा आपल्याला हेवा वाटतो आणि ही बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन लीला गांधी यांनी समारोपाच्या भाषाणात केले. परंपरेने चालत आलेला हा लोककलेचा अमूल्य ठेवा जतन करण्याचे आवाहनही गांधी यांनी अखिल भारतीय लोककला संमेलनाच्या सांगता समारंभात केले.शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जनजागृती महिला मंडळ आणि युवा नेतृत्व अदिती तटकरे यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात दोन दिवसीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या सांगता समारंभाला ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे होते. गांधी म्हणाल्या की, लोककलेला फारपूर्वी अत्यंत तुच्छ मानत असत. लोककलेला सामाजिक प्रतिष्ठाही नव्हती, त्यावेळी एक कलावंत म्हणून आम्ही कसे दिवस काढले त्याची आठवण झाली की, अंगावर शहारे येतात. मात्र शरद पवार मुख्यमंत्री असतानाच्या काळात या लोककलेला खरा राजाश्रय मिळवून दिला आणि लोककलावंतांना सन्मान प्राप्त करून दिला, म्हणूनच आज त्याच लोककलेत आधुनिकता आल्याचे पहायला मिळत आहे. या पारंपरिक लोककलेचा वारसा अविरतपणे जपण्याचे काम सर्वांनीच करायला हवे, असे आवाहनही लीला गांधी यांनी यावेळी केले.आमदार सुनील तटकरे यांनीही महिला सबलीकरणाचा एक भाग म्हणून अशा प्रकारची महिलांना प्रोत्साहन देणारी महिला लोककला संमेलने व्हायला हवीत अशी अपेक्षा व्यक्त करताना, लोककला जिवंत राहिली तरच संस्कृती चिरकाल टिकेल, असा विश्वास व्यक्त केला. शेकापनेत्या माजी आ. मीनाक्षी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, भारूडकार चंदाबाई तिवाडी यांनीही मनोगत व्यक्त करताना संमेलनाच्या आयोजिका अदिती तटकरे यांचे कौतुक केले. यावेळी अण्णासाहेब सावंत बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, अदिती तटकरे आदि उपस्थित होते.
लोककलेचा अमूल्य ठेवा जपा
By admin | Published: January 18, 2016 2:09 AM