बदलत्या शिक्षणपद्धतीनुरूप शिक्षकांनी जागृत राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:54 AM2017-10-29T00:54:17+5:302017-10-29T00:54:17+5:30
शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली
अलिबाग : शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. तोच वारसा घेऊन आज शिक्षक परिषद राज्यात काम करीत आहे. मात्र, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा हळूहळू लोप पावत आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे, बहुजनांना शिक्षणापासून दूर करण्याची व्यवस्था वेगात सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांनी जागृत राहून, हे प्रकार थांबविण्याची गरज आहे, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.
महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित राज्यव्यापी शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आ. पंडित पाटील, महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, उपाध्यक्ष मुरलीधर गोडबोले, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, बीडचे उपनगराध्यक्ष रजपुत इनामदार, प्राध्यापक संघटना जिल्हा अध्यक्ष प्रा. विनोद इंगेवाडा, प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष व्यंकटराव जाधव, माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष विकास चाभरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेने राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. जे समाजात चांगले काम करतात, त्यांना पुरस्कार देण्याची चांगली परंपरा परिषदेने सुरू केली आहे. खºया अर्थाने स्फूर्ती, प्रेरणा देण्याचे काम संस्थेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमार्फत केले जात आहे. जी चळवळ महात्मा ज्योतीराव फुलेंनी त्या वेळी सुरू केली. ती पुढे नेण्याची, वाढविण्याची आवश्यकता आहे. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल अपेक्षित असून शेतकरी, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकून समाजात टिकतील, त्यादृष्टीने, सामाजिक बांधिलकी म्हणून काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.