आली गवर आली... पारंपारिकता जपत रायगडात गौरी आल्या माहेरपणास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 09:49 PM2022-09-03T21:49:10+5:302022-09-03T21:50:30+5:30
निखिल म्हात्रे अलिबाग - रायगड जिल्ह्यात गौरींचे आगमन झाले असून घरोघरी मूर्तींच्या, मुखवट्यांच्या आणि तेरडा या वनस्पतीच्या गौरी महिलांनी ...
निखिल म्हात्रे
अलिबाग - रायगड जिल्ह्यात गौरींचे आगमन झाले असून घरोघरी मूर्तींच्या, मुखवट्यांच्या आणि तेरडा या वनस्पतीच्या गौरी महिलांनी आणल्या आहेत. गौरी माहेरपणासाठी घरी येतात. यासाठीच शेतकरी महिला खास पारंपरिक स्वयंपाक करून त्यांचे कौडकौतुक करतात, अशी श्रद्धा आहे. कृषी संस्कृती आणि मातृसत्ताक जीवन पद्धतीचे प्रतिक असलेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज गौरींचे आगमन, उद्या पूजन आणि परवा विसर्जन होणार आहे.
अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथे डोंगरावरून गौरी आणल्या जातात. पारंपरिक भाजी भाकरीचा नैवेद्य, भेंड या झाडाच्या फुलांनी गौरीपूजन अशा पद्धतीने हा सण खेडोपाडी साजरा केला जातो. माहेरी आलेल्या गौरीला निरोप देताना पौराणिक आख्यान गीतांवर नृत्य करून करण्याची प्रथा अलिबाग तालुक्यातील मल्याण या गावात शतकोनशतके सुरू आहे. ग्रामदेवतेच्या पुढे गौरीची प्रतिमा डोक्यावर घेऊन पुरूष गौरीकथा आणि महात्म्य उपस्थितांपुढे मांडतात आणि नंतरच नदीत तिचे विसर्जन केले जाते. ही शतकोनशतके परंपरा अव्याहतपणे सुरू आहे.
येथील शेतकऱ्यांची अशी धारणा आहे की गौर त्यांच्या घरी येते ती माहेरपणासाठी. तिला आवडीचे पदार्थ दिले जातात. तिचे पूजन अर्चन वंशवाढीसाठीसाठी आवश्यक असते. गौरीचे वर्णन कृषी संस्कृतीच्या विलोभनीय गीतांमधून केले जाते. कुंतीने हे व्रत केल्याचेही या गीतांमधून सांगितले जाते. भेंडीच्या झाडांना फुले येतात, नद्या भरून वाहत असतात तेव्हा गौरीचे आगमन होते, असे वर्णनही यावेळी गायलेल्या गीतांमधून व्यक्त होते. गौरी-गणपतीच्या सणाची पारंपरिकता मल्याण गावाने जपली आहे. विशेष म्हणजे गौरीलाही शिव आणि गणपती प्रमाणे नृत्य प्रिय आहे अशी परंपरा अधोरेखित करणारा विसर्जनापूर्वीचा कार्यक्रम गौरीच्या महतीचा वेगळा आयाम समोर आणतो.
गणपती जणू घरातील एक प्रमुख अशा स्वरुपातच त्याचे आगमन होते. तुपाची वात, तेलाची समई पेटविली जाते. हि अखंडीतपणे गणेश मुर्ती प्रतिस्थापने पासून विसर्झनापर्यंत अखंडीतपणे ठेवली जाते. हि ठेवण्या मागे श्रध्दा हाच एक विषय असतो. एकंदरीत गणेशोत्सव म्हणजे कोकणी माणसाच्या आत्मियतेचा, श्रेध्देचा वर्षनुवर्षे चालत आलेला विषय आहे. गाव गाता गजाली आणि रात्रीस खेळ चाळे या कार्यक्रमांमधून कोकणचे विद्रुप चेहरे समोर आणेल जात असले तरी कोकण हा सण उत्सव साजरा करणारा, भाविकता जपणारा, एकमेकाशी नाल जोडलेला, बाहेरुन काटेरी वाटत असला तरी आतून रसाळ गोड ग-या सारखा असलेला मधूर प्रदेश आहे. या प्रदेशात गणेशोत्सव हा सर्वात प्रिय आणि लोक मनाशी जोडला गेलेला सण आहे. या उत्सवाच्या निमित्ताने कोकणची केमिस्ट्रीच बदलून जात एकमेकांशी संवाद साधणारा मने जोडणारा असा हा सण होऊन जातो.
घराघरात गणपतींचे अगमन होते. घरांची सजावट, दिव्यांची रोषणाई, आणि मंगलमय वातावरणात गणपती सण साजरा होऊ लागतो. गौरी – गणपती असे आई – मुलाचे नाते या उत्सवाच्या निमित्ताने घरोघर जागते केले जाते. गौराई म्हणजे पार्वती हि सृष्टीची जननी आहे. पार्वतीचे रुप कुलदेवतेच्या रुपात पुजले जाते कुल वंश वाढावा म्हणून गौरी पुजनाला नवविवाहीता पाच प्रकारची फळे, पाच प्रकारची पाने, नारळ, विडा, साडी आणि जंगलातील फळा फुलांनी गौराईचे पुजन करतात. गौराईला नऊवारी साडी नेसून नवविवाहीता आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी देविला नवस करते. वंश वेल वाढावी म्हणून पुजा केली जाते. असा हा गौराईचा सण गणपतीतील महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो असे प्राध्यापीका लीना पाटील यांनी लोकमतला सांगितले.