मोहोपाडा : आठ महिने उलटूनसुद्धा तहसील कार्यालयाकडे माहिती अधिकारात मागितलेली कागदपत्रे मिळत नसल्याने खालापुरातील माजगावचे शेतकरी निराश झाले आहेत. दलालांसाठी धावपळ करून कागदपत्रे लगेच गोळा होतात. मात्र, शेतकरी वाऱ्यावर अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
खालापूर तालुक्यातील माजगाव येथील जवळपास ५० शेतकऱ्यांची १५० एकर जमीन ३० वर्षांपूर्वी औद्योगिक कारणासाठी धनिकांनी खरेदी केली होती. जागा विकसित करण्यास सुरुवात झाल्यास सर्वांना रोजगार देऊ, या आश्वासनामुळे शेतकरी आशेवर होते; परंतु जागा विकसित करणे दूरच. जागेची परस्पर विक्री सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. जमीन नाही आणि रोजगारदेखील नसल्याने भूमिहीन शेतकºयांनी तहसीलदारांकडे धाव घेतली. जानेवारी २००७ मध्ये तोडगा काढण्यासाठी खालापूर तहसील कार्यालयात शेतकरी आणि खरेदीदार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बैठकीत तहसीलदारांच्या समोर जागा मालकाने शेतकºयांना जागा विकसित करताना रोजगार देऊ, असा शब्द दिला असल्याचे शेतकरी जयवंत पाटील यांनी सांगितले. तसेच बैठकीत इतिवृत्तातदेखील या चर्चेची नोंद करण्यात आली होती. परंतु त्यानंतरसुद्धा जागेची अनिवासी भारतीयांना प्रचंड किंमत घेऊन विक्री होत असल्याने शेतकºयांना न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. न्यायालयीन कामकाजात तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताची प्रत महत्त्वाची असल्याने शेतकरी जयवंत पाटील यांनी जुलै २०१९मध्ये माहिती अधिकारात या इतिवृत्ताची प्रत मिळावी, अशी मागणी केली. परंतु आठ महिने उलटूनसुद्धा खालापूर तहसील कार्यालयातून इतिवृत्ताची प्रत मिळालेली नाही. वारंवार चकरा मारूनसुद्धा सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी हताश आहेत.२००७ मधील इतिवृत्त सापडत नाही असे तहसील कार्यालयातून सांगण्यात येत आहे. १९९२चा बिनशेती विक्रीचा पेपर कर्जत प्रांतमधून मला अवघ्या १५ मिनिटांत मिळाला. त्यामुळे खालापूर तहसील जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे असे वाटते.- जयवंत पाटील,शेतकरी, माजगावमी कर्मचाºयांना सदरचे इतिवृत्त शोधून द्या, असे आदेश दिले आहेत. गरज पडल्यास दोन कर्मचारी जास्त घ्या, असेदेखील स्टोअरकिपरला सांगितले आहे.- इरेश चप्पलवार,तहसीलदार,खालापूर