केवनाळेची धावपटू साक्षी दाभेकरची उपेक्षा; मदतीपासून वंचित, दरड दुर्घटनेत बालकाला वाचवताना गमावला पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 11:59 AM2021-08-02T11:59:54+5:302021-08-02T12:01:06+5:30

Sakshi Dabhekar : पोलादपूर तालुक्यातील सावित्री खोऱ्यातील केवनाळे गावात गेल्या आठवड्यात   अस्मानी संकटात एका बालकाला वाचवताना आपला पाय गमावलेल्या साक्षी दाभेकर शाळकरी मुलीची उपेक्षा होत आहे.

Kevnale runner Sakshi Dabhekar neglected; Deprived of help | केवनाळेची धावपटू साक्षी दाभेकरची उपेक्षा; मदतीपासून वंचित, दरड दुर्घटनेत बालकाला वाचवताना गमावला पाय

केवनाळेची धावपटू साक्षी दाभेकरची उपेक्षा; मदतीपासून वंचित, दरड दुर्घटनेत बालकाला वाचवताना गमावला पाय

googlenewsNext

पोलादपूर : तालुक्यातील सावित्री खोऱ्यातील केवनाळे गावात गेल्या आठवड्यात   अस्मानी संकटात एका बालकाला वाचवताना आपला पाय गमावलेल्या साक्षी दाभेकर शाळकरी मुलीची उपेक्षा होत आहे. उत्तम धावपटू होण्याचे स्वप्न असलेल्या साक्षीला पुन्हा मैदानात उतरायचे आहे, पण त्यासाठी तिच्या जिद्दीला समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे.

तालुक्यातील सावित्री खोऱ्यातील केवनाळे गावातील गेणू दाभेकर आणि त्यांच्या शेजारच्या चार घरांवर दरड कोसळली होती. शेजारच्या घरातल्या नवजात बालकाचा टाहो तिने ऐकला आणि शाळेत प्रत्येकवेळी धावण्याच्या स्पर्धेत नेहमी पहिला क्रमांक पटकावणाऱ्या साक्षीने तिकडे धाव घेतली. एका उडीतच तिने शेजारचे उफाळेताईंचे घर गाठले आणि समोर दिसणाऱ्या बाळावर शरीराचे कवच केले. दररोज ती खेळवणाऱ्या निरागस हसऱ्या लहानग्याचा जीव वाचविण्यासाठी तिने स्वतःच्या जीवाची पर्वादेखील केली नाही. पुढच्याच मिनिटाला साक्षीनेसुद्धा जोरात किंकाळी फोडली. त्या घराची अर्धी भिंत तिच्या पायावर कोसळली होती. पावसाचे थैमान सुरूच होते. आजूबाजूचे आणखी काहीजण धावले तोपर्यंत लक्षात आले चार घरांवर दरड कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर साक्षी नारायण दाभेकरचा पाय उचलत नव्हता, रक्ताने तो पूर्ण माखला होता. साक्षीवर तातडीने मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

आयुष्यात मोठे धावपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या साक्षीला या अपघातात आपला पाय गमवावा लागला आहे. सध्या तिच्यावर केईएम हॉस्पिटलच्या  नवीन बिल्डिंगमध्ये चौथा माळा, वॉर्ड नं २९ मध्ये ती उपचार घेत आहे. लोकप्रतिनिधींचा लवाजमा तिची विचारपूस करण्यासाठी येतो, मात्र तो रिक्त हाताने फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त सहानुभूतीचे काम संपते. सरकारी लालफितीच्या कारभारातून तिच्या कुटुंबाला तुटपुंजी मदत यापुढे मिळेलसुद्धा, पण त्याने भविष्याचा अंधार कसा मिटणार? हा प्रश्न तिच्यासमोर आहे.  

अपंगावस्थेतही मैदानात उतरण्याची जिद्द 
नियतीने साक्षीला एका पायाने अपंग केले असले तरी ती अभ्यासात प्रचंड हुशार आहे. तिच्याकडे असलेल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर भावी आयुष्यात उत्तुंग यश मिळवण्याचा तिचा निर्धार आहे. समाजातल्या दानशूरांनी आर्थिक मदतीचा एक तरी दिवा लावून तिच्यावर कोसळलेल्या संकटाचा अंधकार दूर करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. दानशुर व्यक्तींनी तिला प्रतीक्षा नारायण दाभेकर, बँक ऑफ इंडिया, पोलादपूर शाखा, खाते क्रमांक : १२०३१०५१०००२८३९, आएफसी कोड : बीकेआयडी०००१२०३ एमआयसीआर, या खात्यावर मदतीचे आवाहन या बँक खातेवर मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
 

Web Title: Kevnale runner Sakshi Dabhekar neglected; Deprived of help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड