दासगाव : महाड-रायगड रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मंजूर झाले. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे पावसाळी सहलींसाठी येणाऱ्या पर्यटकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत असून अपघातांचा धोकाही बळावला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित ठेकेदार आणि महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
ऐतिहासिक किल्ले रायगडावर जाण्यासाठी असलेल्या महाड-रायगड मार्गाच्या रुंदीकरणाचे काम मंजूर झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता आता महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. रुंदीकरण काम एम.बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून, या मार्गाची देखभाल दुरुस्तीही याच कंपनीकडे आहे. मात्र, संबंधित कंपनीने केवळ रस्त्याच्या बाजूने खोदकाम सुरू केले आणि पावसाळा सुरू झाला. धीम्या गतीने सुरू असलेल्या कामाबाबत अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत. मूळ रस्त्याला पडलेले खड्डे, मोऱ्यांसाठी केलेल्या खोदकामामुळे मार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाड-रायगड मार्गावर नाते खिंड, तेटघर, काचले, नाते, चापगाव, वाडा ते कोंझर आदी ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर काचले, चापगाव या ठिकाणी मोºयांसाठी केलेल्या खोदकामामुळे वाहन चालवताना चालकांना अडचणी येत आहेत. त्यातच महाड रायगड मार्गाच्या साइडपट्टीवर खासगी दूरध्वनी कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. रुंदीकरणासाठी केलेले खोदकाम आणि केबल टाकताना केलेल्या खोदकामामुळे वाहने फसण्याचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात या मार्गावर असलेल्या धबधब्यांवर मोठी गर्दी होते. याच मार्गावर कोथुर्डे धरण आहे. रविवारी धरणावर आणि धबधब्यांवर गर्दी असते. यामुळे मार्गावर तरुणांच्या दुचाकींचा वेग वाढलेला असतो. त्यातच मोठ्या वाहनांची संख्या वाढते. खड्डे आणि अरुंद मार्ग यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
महाड-रायगड मार्गाचे काम पाटील कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे आहे. त्यांना खड्डे भरण्यासाठी पत्र दिले आहे. शिवाय साइडपट्टीचे कामही लवकरच करण्यात येणार आहे. - अमोल महाडकर, शाखा अभियंता, महामार्ग बांधकाम विभाग