दासगांव : कोकणाला सध्या पावसाने झोडपले असून समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र पावसाच्या सुरुवातीलाच मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. महाड तालुक्यातील दासगांवच्या हद्दीत धोकादायक वळणावर मोठमोठे खड्डे पडले असून या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग १५ ते २० दिवस खड्डे पडून झाले तरी याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांमध्ये महामार्ग बांधकाम विभागाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडणे हे नवीन नाही. पनवेल ते इंदापूर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाल्यापासून या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील इंदापूर ते कशेडी या महामार्गाच्या कामाला सुरुवात न झाल्याने मात्र या महामार्गाचा काळी कशेडीपर्यंतचा भाग चांगला आहे. परंतु काही ठिकाणावर पावसाच्या सुरुवातीपासूनच खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी पावसाअगोदर महाड तालुक्यातील दासगांव गावाजवळ मुंबई - गोवा महामार्ग मोठ्या प्रमाणात खचला आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. या कामाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याचे महामार्ग अधिकारी सांगत आहेत. रत्नागिरी दिशेला जाणारी वाहने खचलेला रस्ता व खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही बाजूस जाणारी वाहने समोरासमोर येत असून अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. तसेच इंदापूर - कशेडी या दरम्यान अनेक ठिकाणी छोटे मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत. दासगांव खिंडीजवळ धोकादायक वळणावर पडणारे खड्डे याकडे आजही महामार्ग बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.खचलेल्या रस्त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. मंजुरीनंतर लगेच काम करण्यात येईल. मात्र ज्या - ज्या ठिकाणी खड्डे तयार होतील त्या ठिकाणी वेळोवेळी खड्डे भरण्याचे काम सुरू आहे.- ए. एन. ऐरुणकर, शाखा अभियंता, महामार्ग बांधकाम विभाग, महाड
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डे
By admin | Published: July 07, 2016 2:30 AM