- अमोल पाटीलखालापूर - रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करीत बांगलादेशी घुसखोराला अटक केल्याची घटना ताजी असताना सर्वाधिक परप्रांतीय कामगारांचा भरणा असलेला खालापूर तालुक्यातही अशा प्रकारचे घुसखोर असण्याची शक्यता नाकारता येत नसून, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी कारखान्यातील परप्रांतीय कंत्राटी कामगारांची माहिती मिळावी, यासाठी कारखाना व्यवस्थापकांना नोटिसा काढणार असल्याची माहिती दिली आहे. एबीटी या बांगलादेशी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून तीन दिवसांपूर्वी महाड येथून एका बांगलादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती. स्थानिक पोलीस याबाबत अनभिज्ञ असल्याचे कारवाईत समोर आले होते. खालापूर तालुका कारखानदारीचा तालुका असून, लहान-मोठे जवळपास तीनशे कारखाने तालुक्यात आहेत. त्यातच तिसरी मुंबईच्या दिशेने तालुक्याची सुरू असलेल्या घोडदौडीमुळे परप्रांतीयांचा लोंढा दिवसेंदिवस वाढत आहे. पोलाद उत्पादन करणाऱ्या कारखान्यांची संख्या जास्त असून, या ठिकाणी अवजड व धोकादायक काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगारांना कंत्राटी कामगार म्हणून राबविले जाते. उत्तरप्रदेश, बिहार, कोलकाता, ओरिसा, आसामपासून जवळपास सर्वच राज्यांतील तरुण खालापूर तालुक्यातील विविध कारखान्यांत काम करीत आहेत. बहुतेक कारखान्यांत परप्रांतीय कामगारांना राहण्यासाठी खोल्या बांधण्यात आल्या असून, लहान खोल्यांमधून दहा ते बारा कामगार दाटीवाटीने राहत आहेत. तर कारखान्यालगत असलेल्या गावांतून भाडेकरू म्हणून परप्रांतीय कामगारांच्या वस्ती असून, भाडोत्री ठेवताना त्याची माहिती घरमालकाकडून घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. ठेकेदारामार्फत काम करणाºया परप्रांतीय कामगारांची निश्चित संख्या किती आहे, तसेच त्यांचे ओळखपत्र याबद्दल ठोस तपशील उपलब्ध व्हावा, यासाठी खालापूर पोलीस निरीक्षक शेख यांनी माहिती गोळा करण्यासाठी कारखाना व्यवस्थापकांना पत्र दिले आहे. पोलिसांनी उचलेले पाऊल स्वागतार्ह आहे.खालापूर तालुक्यात कारखाना, बांधकाम क्षेत्र तसेच विविध व्यवसाय, काम करणाºया परप्रांतीय कामगारांची संख्या जवळपास अर्धा लाख असण्याची शक्यता असून, मोहपाडा आणि महड येथून तीन वर्षांपूर्वी बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले होते.पोलीस पाटील यांच्या मार्फत हे काम गावागावांत करण्यात येणार आहे, तर कंपन्यामधील एचआर या विभागाकडून कामगारांची पूर्ण माहिती तपासली जाणार आहे. घरमालकांनी यामध्ये सहकार्य करावे, असेही पोलिसांनी आवाहन केले आहे.खालापूर तालुक्यात अनेक गुन्ह्यांत परप्रांतीय तरु णांचा सहभाग उघडकीस आला होता. परराज्यातून तडीपार गुंडांचा वावर खालापूर तालुक्यात असण्याची शक्यता आहे. कोणत्याही घटनेसाठी ही माहिती पोलिसांना उपयुक्त ठरते.
परप्रांतीय कामगारांचे रेकॉर्ड खालापूर पोलीस तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 6:49 AM