खालापुरात आरोग्य यंत्रणेने घेतला गर्भवतीचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 12:00 AM2020-08-13T00:00:18+5:302020-08-13T00:01:16+5:30
हाळ आदिवासीवाडीतील ग्रामस्थ संतप्त; वेळेवर डॉक्टर न मिळाल्याने मूल आणि आई दगावली
- अंकुश मोरे
वावोशी : खालापूर तालुक्यातील हाळ आदिवासीवाडीतील गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ आणि आई दोघेही दगावल्याची घटना घडल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गात सर्वसामान्य नागरिकांसाठी डॉक्टरच देवासमान वाटत असताना, देवच देव्हाऱ्यात नसेल, तर काय वेळ येते, याचा अनुभव हाळ आदिवासीवाडीतील रतन वाघमारे यांना आला.
रतन यांची सात महिन्यांची गर्भवती मुलगी शांती राहुल वाघमारे हिला रविवारी प्रंचड वेदना सुरू झाल्या. वाडीतील आशा सेविकेच्या मदतीने रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला, परंतु रुग्णवाहिका न मिळाल्याने शांतीला रिक्षातून खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. खालापूर आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याचे उत्तर तिथल्या कर्मचाऱ्यांनी दिले. चौक रुग्णालयात घेऊ न जा, असे खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले. अखेर चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करेपर्यंत उशीर झाल्याने शांतीचा मृत्यू झाला. हाळ आदिवासीवाडीवर या घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खालापूर आरोग्य केंद्रात डॉॅक्टर असते, तर वेळेत उपचार मिळून शांतीचा जीव वाचला असता; परंतु कोरोना महामारीतही आरोग्य यंत्रणा बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे.
मुलीच्या मृत्यूनंतरही रतन वाघमारे यांच्या अडचणी वाढत होत्या. चौकवरून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हाळवाडीत मृतदेह न्यायला रुग्णवाहिका सहा हजार रुपये मागत होती.
अखेरीस जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे मदतीला धावले आणि मोफत रुग्णवाहिका मिळाली. तहसीलदार इरेश चप्पलवार यानी मंगळवारी सकाळी वाघमारे कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. रविवारी संपर्क केला असता तर उपचारासाठी प्रयत्न करता आले असते, असे तहसीलदारांनी सांगितले.
आमच्या वाडीतील महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. कोरोना काळातही तालुक्याला डॉक्टर नसतील, तर गरिबांनी जायचे कुठे. याबाबत दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे.
- रवींद्र वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य, हाळ आदिवासी वाडी