खांदेरी किल्ल्याचे होणार संरक्षित स्मारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:34 AM2018-05-11T05:34:21+5:302018-05-11T05:34:21+5:30
रायगड जिल्ह्यातील खांदेरी बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७९ साली बांधलेल्या खांदेरी किल्ल्याचे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून लवकरच घोषणा होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी झाली असून, ११ जूनपर्यंत कोणत्याही हरकती न आल्यास अंतिम अधिसूचनेचा प्रस्ताव सादर होणार असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानने दिली.
मुंबई -रायगड जिल्ह्यातील खांदेरी बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७९ साली बांधलेल्या खांदेरी किल्ल्याचे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून लवकरच घोषणा होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी झाली असून, ११ जूनपर्यंत कोणत्याही हरकती न आल्यास अंतिम अधिसूचनेचा प्रस्ताव सादर होणार असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानने दिली. तसे लेखी आश्वासन राज्य पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी प्रतिष्ठानला दिले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले.
प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर म्हणाले, काहीच दिवसांपूर्वी खांदेरी किल्ल्यावरील गाडलेल्या तोफा प्रतिष्ठानने जमिनीवर काढल्या होत्या. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने हे काम केले होते. त्या वेळी ‘लोकमत’ने किल्ल्याच्या दुर्दशेवर प्रकाश टाकला. किल्ल्यावरून सह्याद्री प्रतिष्ठानने दीड हजार दारूच्या बाटल्या गोळा केल्याचेही वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर किल्ल्याच्या संवर्धन, संरक्षणाची मागणी ‘लोकमत’ने लावून धरली होती.