अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील मासेमारी करणाऱ्यांमध्ये सातत्याने संघर्षाची ठिणगी पडत आहे. रविवार, ८ डिसेंबर रोजी खांदेरी या जलदुर्गावरील वेताळेश्वराच्या मंदिर परिसरात मुंबईतल्या कफपरेड भागातील आणि अलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर परिसरातील कोळी बांधवांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली आहे.
अलिबाग येथील खांदेरी किल्ल्यावर वेताळेश्वराचे मंदिर आहे. दरवर्षी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आणि पूजा करण्यासाठी येतात. कफपरेड-मुंबई येथील काही भक्त तसेच अलिबाग आक्षी-साखर गावातील भक्त दर्शनासाठी गेले होते. त्या वेळी आक्षी-साखर येथील एकाने कफपरेडच्या भक्तांकडे मोबाइल मागितला.
मात्र तू नंबर सांग, मी फोन लावून देतो, असे त्याने सांगितले. याचा राग आल्याने आक्षी-साखरमधील आणि कफपरेडच्या भक्तांमध्ये जोरदार राडा झाला. आक्षीमधील भक्तांनी मारहाण करताना स्टीलची बालदी, दांडके, बीअरच्या बाटल्यांनी संबंधितांना मारहाण केली. त्यामध्ये काही जणांचे डोके फुटले. यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले.सुरुवातीला यलो गेट पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. अलिबामध्ये गुन्हा घडला असल्याने तुम्ही अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार द्या, असे सांगण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ स्तरावर हालचाल केल्यावर पोलिसांनी झीरो नंबरने तक्रार घेतली आणि अलिबाग पोलिसांकडे वर्ग केली.
कफपरेड येथील भक्त हे दारू पिऊन भांडण करीत होते. तसेच एकमेकांच्या अंगावर बाटल्या फेकत होते. त्यातील एक बाटली आक्षीमधील भक्तांच्या जवळ पडली. याचा जाब विचारल्याने मुंबईमधील भक्तांना राग आला आणि त्यांनी मारहाण केली, अशी तक्रार आक्षी-साखर येथील भक्तांनी दिली आहे. याबाबतच्या भांडणाची व्हिडीओ क्लिप आणि फोटो सोशल मीडियावर मंगळवारी सकाळपासून व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
यापूर्वीही घडल्या होत्या मारहाणीच्या घटना
काही दिवसांपूर्वी आक्षी-साखर येथील मासेमारी करणाऱ्यांनी भर समुद्रात रेवस-बोडणी येथील मासेमारी करणाºयांना अशीच मारहाण केली होती. आक्षी-साखरमधील मासेमारी करणारे एलईडी फिशिंग करत होते. त्यांना रेवस-बोडणीमधील मासेमारी करणाºयांनी हटकले होते. त्याचा राग आल्याने रेवस-बोडणीवाल्यांना मारहाण करण्यात आली होती.