खांदेरी किल्ल्याचा बीपीटीच्या माध्यमातून होणार विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:59 AM2019-12-23T00:59:27+5:302019-12-23T00:59:43+5:30

५० कोटी खर्च अपेक्षित : १६ कोटी खर्च करून जेटीचे काम पूर्ण

The Khanderi fort will be developed through BPT | खांदेरी किल्ल्याचा बीपीटीच्या माध्यमातून होणार विकास

खांदेरी किल्ल्याचा बीपीटीच्या माध्यमातून होणार विकास

googlenewsNext

नवी मुंबई : स्वराज्यातील आरमाराच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या खांदेरी किल्ल्याचा बीपीटीच्या माध्यमातून विकास केला जात आहे. १६ एकरच्या बेटावरील या किल्ल्यावर ५० कोटी रूपये खर्च करून विविध विकासकामे सुरू झाली आहेत. १६ कोटी रूपये खर्च करून नवीन जेटीचे काम पूर्ण केले आहे. अलिबागमधील थळसह मुंबईमधूनही किल्यावर जाण्यासाठीची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांसह सिद्दीवर वचक बसविण्यासाठी अलिबागपासून जवळ असलेल्या बेटावर खांदेरी किल्ला बांधला. किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना व पूर्ण झाल्यानंतरही इंग्रजांसोबत अनेक लढाया झाल्या. या लढायांमध्ये स्वराज्यातील आरमाराने इंग्रजांचा अनेकवेळा पराभव केला. समुद्रातील भरती ओहोटी व इतर ज्ञान इंग्रजांसह स्वराज्याच्या मावळ्यांना अधीक असल्याचे या लढायांमध्ये अनेकवेळा सिद्ध झाले. यामुळेच खांदेरी किल्याला स्वराज्यातील आरमाराच्या पराक्रमाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. सद्यस्थितीमध्ये थळ मधून किल्यावर जाण्यासाठी प्रवासी बोट उपलब्ध आहे. गडावर असलेल्या वेताळ देवाच्या मंदिरामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोळीबांधव याठिकाणी येत असतात. बीपीटीचा दीपगृह याठिकाणी असून गडाचा ताबाही त्यांच्याकडे आहे. पर्यटनस्थळ म्हणून गडाचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्यक्षात विकास कामे सुरू करण्यात आली आहेत.
सद्यस्थितीमध्ये १६ कोटी रूपये खर्च करून नवीन जेटीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. गडावर पर्यटकांना बसता यावे यासाठी बैठक व्यवस्थाही तयार केली जात आहे. गडावर हिरवळ विकसीत केली जात आहे. चारही बाजूने प्रदक्षिणा घालता येईल अशापद्धतीने वाटा तयार केल्या जात आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

खांदेरी किल्ल्यावर पर्यटकांना सहज जाता यावे यासाठी मुंबई, नवी मुंबईमधून बोटीची सोय केली जाणार आहे. वॉटर स्पोर्टची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. गडाच्या विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पर्यटकांना राहण्याची व जेवणाची सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे. सरखेल कान्होजी आंग्रे दिपगृहावरून संपूर्ण गड पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. दीपगृहावरून संपूर्ण गड व समुद्रकिनारा पहावयास मिळतो. खांदेरीचा विकास करताना गडाचे ऐतिहासक महत्त्व टिकावे. पर्यटनस्थळ विकसीत करताना येथे येणाऱ्या सर्वांना गडाची निर्मीती व मावळ्यांच्या पराक्रमाची माहिती देणाºया गाईडची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.

मद्यपान बंद करण्यात यावे
च्खांदेरी किल्ल्यावर येणारे काही नागरीक मद्यपान करत असतात. गडावर ठिकठिकाणी दारूच्या बॉटल पहावयास मिळतात. काही दिवसांपुर्वी दोन गटामध्ये मारामारीही झाली होती. यामुळे गडावर मद्यपान करण्यास मनाई करण्यात यावी यासाठी शिवप्रेमींनी पाठपुरावा सुरू केला आहे. याशिवाय गडाच्या बुरूजांवर व खडकांवर रंगाने अनेकांनी स्वत:ची नावे लिहीली आहेत ती पुसण्यात यावीत अशी मागणी होत आहे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
वेताळाचे मंदिर
खांदेरी किल्ल्यावर वेताळ देवाचे मंदिर आहे. रायगड, ठाणे, मुंबई, पालघर परिसरातील कोळी बांधवांचे वेताळ हे दैवत. यामुळे हजारो भावीक दर्शनासाठी याठिकाणी येत असतात.

गडावरील तोफा
गडाच्या चारही बाजूला तटंबंदीवर तोफा पहावयास मिळतात. यामधील काही तोफा सुस्थितीमध्ये आहेत. काहींची दुरवस्था झाली आहे. या तोफा इतिहासप्रेमींची लक्ष वेधून घेतात.
 

Web Title: The Khanderi fort will be developed through BPT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.