खारभूमी विभागाने केला संरक्षक बंधाऱ्यांचा पंचनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:54 AM2019-09-19T00:54:58+5:302019-09-19T00:55:05+5:30
चरी आणि शहापूर येथील संरक्षक बंधा-याचा पंचनामा करण्यासाठी खारभूमी विभागाने बुधवारी सुरुवात केली.
अलिबाग : चरी आणि शहापूर येथील संरक्षक बंधा-याचा पंचनामा करण्यासाठी खारभूमी विभागाने बुधवारी सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यात तब्बल २४ ठिकाणचे संरक्षक बंधारे उद्ध्वस्त झाले होते. येणारी आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी मेहनतीने ते बंधारे बांधले होते. आता खारभूमी विभागाने जागेवर जाऊन पंचनामा केल्यामुळे कामाचे अंदाजपत्रक लवकरच तयार होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रोजगार हमी योजनेतून मजुरी मिळण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
‘रोजगार हमी योजनेतील मजुरी अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करा’ या मथळ््याखाली लोकमतने सर्वप्रथम चरी आणि शहापूरमधील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. वृत्त प्रसिद्ध होताच खारभूमी विभागाचे अधिकारी तातडीने चरी आणि शहापूर गावात पोचले.
आॅगस्ट महिन्यात चरी येथील तीन आणि शहापूर येथील २१ बंधारे अतिवृष्टीने समुद्राला आलेल्या उधाणाच्या पाण्याने फुटले होते. त्यातील बंधारे ग्रामस्थांनी बांधले होते. त्याची पाहणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे नव्याने फुटलेल्या बंधाºयांचा पंचनामा त्यांनी केला.
आपत्तीमुळे फुटलेले संरक्षक बंधारे ग्रामस्थांनी बांधले होते. हे काम रोजगार हमी योजनेत समाविष्ट करून केलेल्या कामाची मजुरी ग्रामस्थांच्या खात्यात वर्ग करावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली होती. मात्र, खारभूमी उपअभियंता आणि अलिबागचे तहसीलदार यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना अद्यापही मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही रक्कम संबंधित अधिकाºयांच्या पगारातून वसूल करावी अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याचप्रमाणे कामचुकार अधिकाºयांची तातडीने बदली करावी अशीही मागणी करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा प्रशासन आणि खारभूमी विभाग खडबडून जागे झाले. खारभूमी विभागाने तातडीने घटनास्थळी आता धाव घेतली आहे. गावातील फुटलेल्या संरक्षक बंधाºयाची पाहणी खारभूमी विभागाचे कनिष्ठ अभियंता एम. जी. पाटील आणि शुभम चव्हाण यांनी केली. तसेच ग्रामस्थांनी कोणते बंधारे उभारले आहेत त्याबाबतचे मोजमाप आमच्याकडून घेतल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अधिक माहितीसाठी खारभूमी विभागाचे उपअभियंता सुरेश शिरसाट यांच्याशी संपर्क झाला नाही.
>गावात नव्याने चार संरक्षक बंधारे फुटले आहेत. त्यातील एका बंधाºयाचे मोजमाप करण्याचे काम सुरू होते. हा बंधारा सुमारे ३० फुटांहून अधिक फुटला आहे. खारभूमी अधिकाºयांना त्याचे मोजमाप करताना मीटरपट्टीची टेप कमी पडली. त्यामुळे दोन वेळा मोजमाप करावे लागले. यावरूनच बंधारा किती मोठ्या प्रमाणात फुटला असेल याची गंभीरता दिसून येते, असेही श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी स्पष्ट केले.