पनवेल : खारघरमध्ये एक आठवड्यापासून माकडाचा उपद्रव वाढला होता. अखेर या माकडाला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. सेक्टर २ व ८ मध्ये या माकडाने सहा ते सात रहिवाशांना जखमी केले होते. स्थानिक नगरसेविका आरती नवघरे यांनी वनविभागाकडे यासंदर्भात तक्र ार केली होती. त्यानंतर वनविभागाने याठिकाणी माकडाला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र पिंजरा योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याने पिंजऱ्यातील केळी खाऊन माकड पसार झाले होते.
वनविभागाने लावलेला पिंजरा निष्फळ ठरल्याने स्थानिक रहिवासी रामचंद्र देवरे यांनी यासंदर्भात वनविभागाकडे नाराजी व्यक्त केली होती. या परिसरात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता वनविभागाचे अधिकारी डी. एस. सोनावणे यांनी बुधवारी माकड पकडण्यास तरबेज असलेल्या हकीम शेखला खारघरमध्ये पाचारण केले. शेखने विशिष्ट पद्धतीने सापळा तयार करून या माकडाला पिंजºयात बंद केले. यावेळी प्राणिमित्र रघुनाथ जाधव, वनविभागाचे टी. टी. ओव्हाळ, जनार्दन काळे आदी कर्मचारी उपस्थित होते. माकडाला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.