वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: मुंबई महानगरपरिसरात नजीकच्या काळात प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.याबाबत शासनाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याच धर्तीवर प्रदूषणकारी अवजड वाहनांवर खारघर टोल नाक्यावर पाण्याची फवारणी करण्यासाठी यंत्रणा बसविण्यात आली. आजपासून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक गावी जात आहेत.सणासुदीच्या काळात प्रदूषणाचा घातक परिणाम नागरिकांवर होऊ नये म्हणून शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.त्याचाच भाग म्हणून खारघर कोपरा टोल नाक्यावर अवजड वाहनांमधून अथवा वाहनांमुळे हवेत उडणारे धुळीचे कण कमी व्हावेत यादृष्टीने टोल नाक्यावर स्प्रेईंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.यामुळे वाहनांवर पाण्याची फवारणी केली जाणार आहे.यामुळे वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर काही प्रमाणात नियंत्रण येणार आहे.पुढील तीन ते चार दिवस हि यंत्रणा कार्यान्वित राहणार असल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.जेएनपीटी बंदर ,एपीएमसी,स्टील मार्केट,तळोजा एमआयडीसीसह इतर राज्यात जाणारी वाहने बहूतांशी या मार्गातुन येजा करीत असतात.शासनाच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिकेने हि यंत्रणा उभारली आहे.