अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पीक वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 02:19 AM2019-11-03T02:19:08+5:302019-11-03T02:19:33+5:30
कडधान्य, नाचणी पिकांचीही नासाडी । जिल्ह्यातील शेतीला पावसाचा तडाखा; शेतकरी हवालदिल
पेण : परतीच्या पावसाने सध्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पेण ग्रामीण भागात कापलेल्या भातशेतीमध्ये पावसाचे पाणी साचल्याने भाताची ताटे भिजून त्यांना अंकुर फुटून लागले आहेत. त्यामुळे तांदूळ खराब होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. जादा मजुरी मोजून घरी नेण्यासाठी जे पीक शेतात काढून ठेवले होते, तेही पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक वाया गेल्याने जगायचे कसे? या चिंतेत शेतकरी आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकºयांसाठी शापीत ठरला आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला पावसाने जुलै महिन्यात चांगलाच जोर धरला. आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यांतील सण-उत्सवातही पावसाचा जोर कायम होता. बाप्पांचे आगमन असो, विसर्जन सोहळा असो, पावसाने आपला इंगा दाखवला. नवरात्रोत्सवातही पावसाचा धुमाकूळ सुरू होता. दिवाळीत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील सर्व पिकाची नासाडी झाली आहे. कापणी केलेले भातपीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भातशेती संकटात सापडून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वर्षभराचा ताळेबंद जुळवायचा कसा? या चिंतेत बळीराजा आहे. यंदा पहिल्यांदाच ओल्या दुष्काळाची झळ कोकणला बसल्याने खरीप हंगामातील सर्व पीक वाया गेले आहे.
पेण खारेपाटातील भातशेती आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत आलेल्या महापुरात वाहून गेली होती. त्यानंतरही इकडून-तिकडून रोपे जमा करून लावलेल्या भातशेतीला क्यार चक्रिवादळाचा फटका बसला. त्यातून वाचलेल्या काही भातपिकाची कापणी सुरू असताना परतीच्या पावसाने घात केला. त्यामुळे कापणी केलेल्या भातपिकाला अंकुर फुटले असून, तांदूळ खराब झाला आहे. या भातशेतीची पाहणी दौरा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पेणचे आ. रवींद्र पाटील यांनी केला. पेण तालुक्यातील वाशी, वढाव, भाल, वर्तकनगर, विठ्ठलवाडी या परिसरात त्यांनी भातशेती शिवार पाहणी दौरा केला. तसेच लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल, याबाबत शेतकरी वर्गाला आश्वस्त केले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.
पालकमंत्र्यांची बांधावरून पाहणी
वडखळ : रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी आमदार रवींद्र पाटील यांच्यासह पेण तालुक्यातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. या वेळी युवानेते वैकुंठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय जांभळे, वडखळचे सरपंच राजेश मोकल, वढावच्या सरपंच पूजा अशोक पाटील, नायब तहसीलदार धनंजय कांबळे, गटविकास अधिकारी पी. एम. पाटील, तालुका कृषी अधिकारी आदीसह शेतकरी उपस्थित होते.
परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्याला चांगलेच झोडपले आहे. पेण तालुक्यातील चार हजार ८६३ हेक्टर भातशेती पूर्णपणे नामशेष झाली आहे. वाशी, वाढाव, कलेश्री, भाल, या खारेपाट विभागातील तसेच हमरापूर, तांबडशेत, सोनखार, उरणोली, कळवे या विभागातील भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री चव्हाण यांनी आमदार रवींद्र पाटील यांच्यासह वाशी-खारेपाट व हमरापूर विभागात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची माहिती घेतली. परतीच्या पावसाने भातशेती भिजून भाताच्या रोपांना पुन्हा कोंब फुटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले
म्हसळा : चालू वर्षात झालेल्या विक्रमी व अवेळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सप्टेंबरमध्ये पावसाने भातशेतीला फटका दिला. आता परतीच्या पावसातही भातशेतीचे तालुक्यात मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यासाठी शेतीचे तत्काळ पंचनामे व सरसकट नुकसानभरपाई मिळावी, यासाठी म्हसळा शिवसेना तालुकाप्रमुख महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार शरद गोसावी यांना निवेदन दिले आहे.
तालुक्यात भात हे मुख्य पीक घेतले जाते. नागली, वरी, तूर, मूग, उडीद, तीळ आदी दुय्यम पिके घेण्यात येतात. आजपर्यंत सुमारे ५००० मि.मी. पाऊस झाला आहे. कापणीच्या हंगामात पाऊस पडल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई तत्काळ मिळणे आवश्यक असल्याचे या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख महादेव पाटील यांनी सांगितले.
पिकोत्पादनात घट; बळीराजा चिंताग्रस्त
नागोठणे : परतीच्या पावसामुळे काहीअंशी शिल्लक राहिलेले भातपीकसुद्धा हातातून गेले आहे, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यास शनिवारपासून सुरुवात झाल्याने शेतकºयांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
नवरात्री दरम्यान आश्विन महिन्यात साधारण भातपिकाच्या कापणीस सुरुवात करण्यात येते. मात्र, यंदा दिवाळीचा सण उलटूनही पावसाचा जोर कायमच राहिला असल्याने भातकापणीस विलंब झाला. त्यात परतीच्या पावसाने तोंडचा घास हिरावून घेतल्याचे शेतकरी हताशपणे सांगतात. आदिवासी समाजाचे डॉ. जानू हंबीर सांगतात, काहींनी भात कापून शेतातच आडवे करून ठेवले होते; परंतु पाणी साचल्याने भाताला कोंब आले आहेत. वरीचे पीकसुद्धा जवळपास हातातून गेले असून पेरलेली चवळी तसेच वाल, पावटा या कडधान्यांची पिकेसुद्धा नष्ट झाल्याने शेतकºयांनी उदरनिर्वाह करायचा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंचनामा करण्यास सुरुवात केली असून विविध गावांमध्ये पंचनामा केला जात असल्याचे तलाठी सजाचे अनंत म्हात्रे केले.
तालुक्यात कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून भात व खरिपातील अन्य पिकांच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तत्काळ सुरू केले आहे. - शरद गोसावी, तहसीलदार, म्हसळा.