पर्यावरण संवर्धनात खारीचा वाटा.., एक हजार कागदी पिशव्या करून केले वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 09:17 PM2018-05-01T21:17:29+5:302018-05-01T21:17:29+5:30
प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी ही आपल्याच भविष्यासाठी अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी सुचवलेल्या कल्पनेची अंमलबजावणी शाळेची परीक्षा संपल्यावर सुट्टीची सदुपयोग करून इयत्ता सातवीमधील सात विद्यार्थिनींनी कागदी पिशव्या तयार करून केली आहे.
- जयंत धुळप
अलिबाग- प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी ही आपल्याच भविष्यासाठी अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी सुचवलेल्या कल्पनेची अंमलबजावणी शाळेची परीक्षा संपल्यावर सुट्टीची सदुपयोग करून इयत्ता सातवीमधील सात विद्यार्थिनींनी कागदी पिशव्या तयार करून केली आहे. केवळ पिशव्या तयार केल्या नाहीत तर अलिबाग शहरातील भाजी विक्रेत्या आणि मेडिकल शॉप्स मध्ये ४० पिशव्याचा एक गठ्ठा प्रत्यक्ष जाऊन त्यांना सुपूर्त करून या मुलींनी या सर्वाना अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.
येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या इयत्ता सातवीची परीक्षा दिलेल्या या सात विद्यार्थिनींमध्ये मृणालिनी चंद्रशेखर-कीर्ती साठ्ये, मृण्मयी मंगेश-मृदुला टिबे, प्रीती प्रभू-शकुन मेहता, आसावरी प्रल्हाद-प्रणिता म्हात्रे, श्रावणी राकेश-यशवंती सरतांडेल, तन्वी रुपेश-ऋजुता पाटील आणि पर्णवी दिनेश-दर्शना पाटील यांचा समावेश आहे.
आमच्या आयुष्यात आम्हाला प्रदूषणमुक्त पर्यावरण हवे आहे, ते निर्माण करण्याची जबाबदारी आमचीच आहे आणि म्हणूनच आम्ही हा उपक्रम करित आहोत, असा सुप्त संदेश देणा-या या सातही विद्यार्थिनी आपला हा उपक्रम पुढेही सुरू ठेवणार आहेत. रविवारी अलिबाग बाजारपेठेत त्यांनी तयार केलेल्या पिशव्याचे वाटप केले, त्यावेळी नागरिकांनी त्यांचे आवर्जून कौतुक केले.