खरसई सरपंचपदी नीलेश मांदाडकर
By Admin | Published: March 29, 2017 05:03 AM2017-03-29T05:03:58+5:302017-03-29T05:03:58+5:30
म्हसळा तालुक्यातील सर्वात मोठ्या खरसई ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड सोमवारी २७ मार्च रोजी करण्यात आली
म्हसळा : तालुक्यातील सर्वात मोठ्या खरसई ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड सोमवारी २७ मार्च रोजी करण्यात आली. शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी युतीचे तथा शेतकरी कामगार पक्षाचे तालुका युवा अध्यक्ष नीलेश मांदाडकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेतील युतीनंतर झालेल्या पहिल्याच सरपंचपदाच्या निवडीत युतीचे नीलेश मांदाडकर यांची निवड झाल्याने तालुक्यात आघाडीच्या कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे.
ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य असून त्यामध्ये सेनेचे ३, शेतकरी कामगार पक्षाचे २, काँग्रेसचा १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे पक्षीय बलाबल असून सेना व काँग्रेसच्या सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने मांदाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच नीलेश मांदाडकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका चिटणीस संतोष पाटील, माजी तालुका चिटणीस परशुराम मांदाडकर, उपसभापती मधुकर गायकर, श्रीपत धोकटे, भाऊ म्हात्रे, माजी जि.प. सदस्या गौरी पयेर, जांभूळ सरपंच तुकाराम महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.(वार्ताहर)